पुणे : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाने शानदार विजय साजरा केल्यानंतर पुढील सामना कटकमध्ये खेळवला जाणार आहे. पण टीम इंडियाचा पुण्यातील मुक्काम वाढवण्यात आला आहे. कटकच्या हॉटेलमध्ये जागा नसल्याने हा मुक्काम वाढवण्यात आल्याचं बोललं जात आहे.
इग्लंडचा संघ कटकमध्ये दाखल झाला असून सरावाला देखील सुरुवात केली आहे. मात्र भारतीय संघाने पुण्यातच सराव केला. भारतीय संघ ज्या होटलमध्ये थांबणार होता, तिथे लग्नसोहळा असल्याने सर्व रुम बूक करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे टीम इंडियाला मंगळवारपर्यंत पुण्यातच रहावं लागलं.
दरम्यान बुधवारी भारतीय संघासाठी रुम उपलब्ध होतील आणि साडे 11 पर्यंत संघ कटकमध्ये दाखल होईल, अशी माहिती आहे.
टीम इंडियाचा पुण्यातच सराव
कटकच्या दुसऱ्या वन डेआधी टीम इंडियाने मंगळवारी पुण्यातच गहुंजे स्टेडियमवर सराव केला. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार आणि मनीष पांडेसह भारतीय खेळाडूंनी सरावाआधी फुटबॉलचा आनंद लुटला आणि नेट्समध्ये सराव केला.
भारताचा माजी कर्णधार धोनीने गहुंजे स्टेडियमच्या नेट्समध्ये बराच वेळ घाम गाळला. पहिल्या वन डेत धोनीने यष्टिरक्षक म्हणून आपली छाप सोडली होती. पण तो अवघ्या सहा धावांवर बाद झाला होता.