नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात भाजपशी दोन हात करण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने काँग्रेसचा हात हातात घेतला आहे.


यूपीत सपा-काँग्रेसने आघाडी केल्याचं काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं.

समाजवादी पक्षाशी आघाडी झाली आहे. येत्या काही दिवसात या आघाडीचं महाआघाडीत रुपांतर होईल, असं आझाद म्हणाले.

अखिलेश यादव यांनी स्वत:च काँग्रेसशी आघाडीबाबतची चर्चा सुरु असल्याचं आज सकाळीच 'एबीपी न्यूज'ला सांगितलं होतं.

दुसरीकडे गुलाम नबी आझाद यांच्या आघाडीबाबतच्या वक्तव्यानंतर, उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

एकाचवेळी मुख्यमंत्रीपदाच्या दोन उमेदवारांसह निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेते, असं शीला दीक्षित म्हणाल्या.
'सायकल' अखिलेश यादवांची, मुलायमसिंह यादवांना मोठा धक्का

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यांच्यातील चिन्हासाठीच्या वादात अखिलेश यांनी बाजी मारली. समाजवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह ‘सायकल’ या दोन्ही गोष्टी अखिलेश यादव यांना मिळालं . यासंदर्भात निवडणूक आयोगनं  आपला महत्वपूर्ण निर्णय जाहीर करुन अखिलेश यादव यांना दिलासा दिला आहे.