IND U19 vs AUS U19 Final : टीम इंडियाला फक्त 84 दिवसांत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने अंडर 19 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 79 धावांनी पराभव केला. यापूर्वी 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची फलंदाजी अंतिम फेरीत फ्लॉप ठरली. आदर्श सिंह आणि मुरुगन अभिषेक यांच्याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही.


विशेष म्हणजे रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी करून अंतिम फेरी गाठली होती. साखळी फेरीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विजयी मोहिम सुरु केली होती. मात्र, त्याच ऑस्ट्रेलियाने फायनलला भारताला दणका दिला. तोच प्रवास अंडर 19 टीम इंडियाच्या शिलेदारांनी केला. मात्र, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार झाला नाही.






टीम इंडियाची खराब फलंदाजी


अंतिम सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी खूपच निराशाजनक होती. टीम इंडिया 43.5 षटकात 174 धावा करत ऑलआऊट झाली. सलामीवीर आदर्श सिंहने 77 चेंडूत 47 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. मुशीर खान 33 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. अभिषेकने 42 धावांचे योगदान दिले. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. अर्शीन कुलकर्णी 3 धावा करून बाद झाला. कर्णधार उदय सहारन 8 धावा करून बाहेर पडला. सचिन आणि प्रियांशू 9-9 धावा करून बाद झाले.


ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दाखवली फलंदाजीची ताकद 


ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सॅमच्या रूपाने त्याची पहिली विकेट पडली. तो शून्यावर बाद झाला. मात्र यानंतर कॅप्टन ह्यू आणि हॅरी डिक्सन यांच्यात चांगली भागीदारी झाली. डिक्सनने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 42 धावा केल्या. ह्यूने 48 धावांची खेळी खेळली. हरजस सिंगने अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूत 55 धावा केल्या. ऑलिव्हरने 46 धावांचे योगदान दिले.






ऑस्ट्रेलियाचा 84 दिवसांत दुसऱ्यांदा भारतावर अंतिम फेरीत विजय 


टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 दिवसांत हा दुसरा पराभव आहे. याआधी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वरिष्ठ संघाने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभव 


तत्पूर्वी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या दुसऱ्या पर्वाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य होते. पण टीम इंडिया खेळाच्या 5व्या दिवशी 234 धावांवर गुंडाळली गेली. त्यामुळे नऊ महिन्यात  टीम इंडियाने गुडघे टेकण्यास भाग पडले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या