BCCI on Team India : बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 1-3 असा पराभव झाल्यानंतर तेव्हा सुनील गावस्कर आणि इरफान पठाण यांच्या विधानांची बरीच चर्चा झाली होती. या दोन्ही माजी खेळाडूंनी भारतीय संघात स्टार कल्चर बदलाची मागणी केली होती आणि टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे, असे म्हटले होते. यानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. त्यामुळे टीम इंडियामधील रथी महारथींची पळापळ सुरु झाली आहे. जे स्टार फलंदाज बरेच दिवस देशांतर्गत क्रिकेटपासून दूर होते ते आता पुन्हा एकदा दिसणार आहेत. या यादीत विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत यांचा समावेश आहे.


बायकोसोबत आता फक्त 14 दिवस मिळणार


दैनिक जागरणने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे अधिकारी, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्यात झालेल्या आढावा बैठकीत भारतीय खेळाडूंच्या पत्नींना त्यांच्यासोबत राहता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय नियम पुन्हा लागू करण्याचा विचार करत आहे.


पत्नीसोबत राहण्याचे नियम बदलतील


संपूर्ण दौऱ्यात भारतीय संघातील खेळाडू आणि त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना प्रवास करता येणार नाही. जर एखादी स्पर्धा किंवा मालिका 45 दिवसांपेक्षा जास्त चालली तर पत्नी किंवा कुटुंब केवळ14 दिवस खेळाडूसोबत राहू शकतात. छोट्या टूरसाठी ही मर्यादा फक्त सात दिवसांची असेल.


सर्व खेळाडू बसमध्ये एकत्र प्रवास करतील


रिपोर्टनुसार, “संघाची एकजूट लक्षात घेऊन आता सर्व खेळाडू फक्त टीम बसमध्येच प्रवास करतील. खेळाडू कितीही जुना असला तरी त्याला वेगळा प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.” खेळाडूंव्यतिरिक्त, बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या व्यवस्थापकालाही संघाच्या हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना व्हीआयपी बॉक्समधून सामना पाहण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यांना टीम बस वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, गावस्कर म्हणाले होते की, भारताच्या नियमित खेळाडूंनी त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व केले पाहिजे. रणजी ट्रॉफीची पुढील फेरी 23 जानेवारीला आहे, बघूया या संघातील किती खेळाडू खेळतात? जर तुम्ही त्या सामन्यांमध्ये खेळला नाही तर गौतम गंभीरला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे माझे म्हणणे आहे. ​​इरफान पठाणने सुद्धा 'स्टार कल्चर' बदलण्याची मागणी केली होती.  


पंत, रोहित, जैस्वाल नक्की खेळतील, कोहलीवर सस्पेन्स


रोहित शर्मा रणजीमध्ये खेळणार हे निश्चित मानले जात आहे. तो मुंबई संघासोबत सराव करतानाही दिसला. यशस्वी जैस्वालही मुंबई संघात सामील होणार आहे. रणजी सामन्यांमध्येही तो आपली प्रतिभा दाखवेल असे मानले जात आहे. मात्र, रोहित मुंबईच्या आगामी जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही हे अनिश्चित आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत रोहित शर्मासह भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यासाठी झगडावे लागले. रोहितने तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावात केवळ 31 धावा केल्या, तर मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या 10 धावा होती.


दरम्यान, ऋषभ पंतने 23 जानेवारीपासून राजकोटमध्ये सौराष्ट्रविरुद्ध दिल्लीच्या पुढील रणजी ट्रॉफी सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले आहे. डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे. 2017-2018 हंगामात पंत शेवटचा रणजी सामना खेळला होता. 2012 मध्ये दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीमध्ये शेवटचा भाग घेतलेल्या विराट कोहलीच्या सहभागाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. बीजीटीमध्ये विराट कोहलीची कामगिरीही खराब होती. कोहलीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT) च्या 5 कसोटी सामन्यात 23.75 च्या सरासरीने 190 धावा केल्या होत्या. शुभमन गिलही रणजी ट्रॉफीमध्ये पंजाब संघाकडून खेळताना दिसणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या