लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीतील 'करो या मरो'च्या लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करुन उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 192 धावांच्या लक्ष्याचा भारतीय फलंदाजांनी 8 गडी आणि 72 चेंडू राखून यशस्वी पाठलाग केला.
टीम इंडियाने फलंदाजीची चांगली सुरुवात केली, मात्र 23 धावसंख्या असताना सलामीवीर रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. मात्र शिखर धवन आणि त्याच्या साथीने आलेल्या कर्णधार विराट कोहलीने महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताला विजयाच्या जवळ नेलं.
शिखर धवनने 83 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 78 धावा ठोकल्या. तर विराटने नाबाद 76 धावा करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. युवराज सिंहने नाबाद 23 धावा केल्या.
फलंदाजीची दमदार सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची मात्र या सामन्यात साफ निराशा झाली. क्निन्टॉन डी कॉक आणि हाशिम अमलाने 76 धावांची सलामी दिली खरी, पण त्यासाठी त्यांना 105 चेंडू खर्ची घालण्याची वेळ आली.
कारण भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकी सलामीवीरांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. त्यानंतर क्निन्टॉन डी कॉक आणि फॅफ ड्यू प्लेसीने सात षटकांत 40 धावांची भागीदारी रचली. पण रवींद्र जाडेजाने डी कॉकचा त्रिफळा उडवला आणि तिथून दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी उडाली. दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे नऊ फलंदाज अवघ्या 76 धावांत माघारी परतले.
उपांत्य सामन्यात भारताची गाठ बांगलादेशसोबत होणार आहे. बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेल्या विजयासोबतच उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. 15 जूनला हा सामना खेळवला जाईल.