ओव्हल : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीची दणदणीत सुरुवात केली आहे. भारताने ओव्हलच्या मैदानावर झालेल्या सराव सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडवर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. दोघांनीही प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडला 38.4 षटकांमध्ये सर्व बाद 189 धावांचंच आव्हान देता आलं.

टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि त्याच्या साथीला आलेल्या विराट कोहलीने शानदार भागीदारी रचली. विराटने नाबाद 52, तर शिखर धवनने 40 धावांची खेळी रचली. शिखर धवननंतर आलेला दिनेश कार्तिक खातंही न उघडता माघारी परतला. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी आणि विराटने यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच पावसाने व्यत्यय आणला.

भारतीय गोलंदाजांची दिलासादायक कामगिरी

पाऊस न थांबल्याने अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारताने न्यूझीलंडवर 45 धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी केलेली सराव सामन्यातील कामगिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला मोठा दिलासा आहे.

फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही.

बांगलादेशविरुद्ध दुसरा सराव सामना

चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. 4 जून रोजी हा सामना खेळवला जाईल. 8 जूनला श्रीलंकेसोबत भारताचा सामना असेल, तर 11 जून रोजी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

दरम्यान या सामन्यांपूर्वी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे. पहिला सराव सामना 28 मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध पार पडला. तर दुसरा सराव सामना 30 मे रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. दोन गटांमध्ये संघांचं विभाजन करण्यात आलं आहे.

पहिल्या गटामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सर्व संघ प्रत्येकी 3 सामने खेळतील आणि गटातील वरील दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.

  • ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड

  • ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका