मुंबई : इंग्लंडमध्ये 1 जूनपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. मात्र या मालिकेत टीम इंडियाचा विकेटकीपर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत विकेटकीपर म्हणून आतापर्यंत सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याच्या नावावर एकूण 33 विकेट्स आहेत. मात्र सध्या हा विक्रम मोडण्याची संधी धोनीकडे आहे. धोनीच्या नावावर 11 सामन्यात 15 विकेट्स आहेत, ज्यामध्ये 11 झेल आणि 4 स्टम्पिंगचा समावेश आहे.
संगकाराने 22 सामन्यात 33 फलंदाजांना माघारी धाडलं. यामध्ये 28 झेल आणि 5 स्टम्पिंगचा समावेश आहे.
संगकारानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टचा (25 विकेट, 23 झेल, 2 स्टम्पिंग) क्रमांक लागतो. मात्र गिलख्रिस्टनेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे.
गिलख्रिस्टनंतर मार्क बाऊचरच्या नावावर 19 विकेट आहेत. ज्यामध्ये 17 झेल आणि 2 स्टम्पिंगचा समावेश आहे.
सध्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनीनंतर इंग्लंडच्या जोस बटलरचा क्रमांक लागतो. त्याच्या नावावर नऊ विकेट्स आहेत. तर तीन विकेट नावावर असणाऱ्या दिनेश कार्तिकचा तिसरा आणि इयॉन मॉर्गनचा चौथा (3 विकेट्स) क्रमांक लागतो.
कदाचित धोनीची ही अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी ठरु शकते. त्यामुळे धोनीसमोर संगकाराचा विक्रम मोडीत काढण्याचं आव्हान असेल. धोनीने कसोटीमधून अगोदरच निवृत्ती घेतली आहे. सध्या तो केवळ वन डे आणि टी-20 क्रिकेट खेळतो.