नॉटिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर फलंदाज मुरली विजयच्या जागी त्याला संधी देण्यात आली.
भारतीय संघातील दुसरा बदल म्हणजे हैदराबादचा युवा फलंदाज हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघातील हा दुसरा मोठा बदल आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त तीन सामन्यांसाठीच भारतीय संघ निवडण्यात आला होता.
इंग्लंडविरुद्धचे उर्वरित दोन कसोटी सामने 30 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर रोजी अनुक्रमे साऊथेम्पटन आणि लंडनमध्ये खेळवण्यात येणार आहेत. नॉटिंगहॅम कसोटीत भारताने आजच इंग्लंडवर विजय मिळवला. त्यानतंर नॉटिंगहॅममध्येच निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली.
उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, हनुमा विहारी, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर
पृथ्वी शॉला कामाची पावती
विश्वविजेत्या अंडर-19 भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ सध्या दमदार फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या प्रथम श्रेणी सामन्यातही त्याने शतकी खेळी केली होती. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. रणजी आणि दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉच्या नावावर आतापर्यंत सात शतकं आणि पाच अर्धशतकं आहेत.
कोण आहे हनुमा विहारी?
हैदराबादच्या 24 वर्षीय हनुमा विहारीने दमदार कामगिरी केली आहे, ज्याच्या बळावर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 15 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.