मुंबई : शुभम रांजणेच्या अष्टपैलू खेळीमुळे आर्क्स अंधेरी संघाने नॉर्थ मुंबई पँथर्सवर 23 धावांनी विजय मिळवला. आर्क्स अंधेरीने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेच्या नॉर्थ मुंबई पँथर्सचा डाव 141 धावांत आटोपला.
मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित टी ट्वेन्टी मुंबई लीगचा हा सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. त्याआधी शुभम रांजणे आणि पराग खानापूरकरने अर्धशतकं झळकावताना अंधेरी संघाला सात बाद 164 धावांची मजल मारुन दिली.
शुभम रांजणेने 65 धावांची खेळी केली, तर खानापूरकरने 61 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आर्क्स अंधेरीच्या प्रभावी माऱ्यामुळे नॉर्थ मुंबई पँथर्सचा विजय 23 धावांनी दूर राहिला. अंधेरीकडून तुषार देशपांडेने 3, तर शुभम रांजणेने 2 फलंदाजांना माघारी धाडलं.