नवी दिल्ली : बीसीसीआयच्या प्रशासनाची सूत्रं कोणाच्या हाती सोपवली जाणार, याचा निर्णय अजूनही होऊ शकलेला नाही. बीसीसीआय प्रकरणात निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या अॅमिक्स क्युरी गोपाल सुब्रमण्यम आणि ज्येष्ठ विधीज्ञ अनिल दिवाण यांच्या द्विसदस्यीय समितीने सुचवेली नऊ प्रशासकांची नावं सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहेत.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत नऊ प्रशासकांची नावं सीलबंद लखोट्यातून सर्वोच्च न्यायालयाला सादर केली होती. पण 70 वर्षांवरील एकाही व्यक्तीची बीसीसीआयच्या प्रशासनात नेमणूक केली जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
केंद्र सरकार, बीसीसीआयला नावं सुचवण्याची परवानगी
दरम्यान बीसीसीआय आणि केंद्र सरकारने नावं सुचवण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाकडे मागितली होती. सुप्रीम कोर्टाने ही परवानगी मान्य केली असून 27 जानेवारीपर्यंत सील बंद लिफाफ्यात नावं द्यावीत, असं कोर्टाने म्हटलं आहे.
अॅमिक्स क्युरी गोपाल सुब्रमण्यम आणि ज्येष्ठ विधीज्ञ अनिल दिवाण यांच्या द्विसदस्यीय समितीने निवडलेल्या व्यक्तींचं वय 70 वर्षांपेक्षा अधिक होतं. लोढा समितीच्या शिफारशीनुसार प्रशासक म्हणून 70 वर्षांवरील व्यक्तीची निवड करता येणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीवेळी नावं निश्चित केली जातील, असं स्पष्ट केलं.