नाशिक: मेंदूबाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेलं नाशिकमधलं वासा उपचार केंद्र सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. डॉ.राजूल वासा यांनी संशोधन केलेल्या या उपचार पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी अमेरीकन, युरोपीय देशातले डॉक्टर्स, रुग्ण सध्या नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.


शेकडो रुग्णांना जीवदान

सेलिब्रल पायसी, अॅक्सिडेंटेड ब्रेन डॅमेजेस, पॅरालेसिस अशा असाध्य आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांचं रुग्णालय. इथली उपचार पद्धती पाहून तुम्ही गोंधळाल, पण, डॉ.राजूल वासा यांच्या याच उपचार पद्धतीनं जगभरातील शेकडो रुग्णांना जीवदान दिलं आहे.


गेल्या 100 वर्षात जगभरातल्या शास्त्रज्ञांना जे जमलं नाही, ते वासांनी साध्य केलंय. गुरुत्वाकर्षणाचा नीट वापर केला तर मेंदु विकसित होतो. या गृहितकावर डॉ.वासांनी ही उपचार पद्धती शोधली आहे. चुंबकीय शक्तीच्या उपयोगातून शरीर आणि मेंदूचा संपर्क पुनर्प्रस्तापित करुन रुग्णाला नॉर्मल करण्याची ही पद्धती गुणकारी ठरत आहे.   


काय आहे वासा उपचार पध्दती ?


उपचार पध्दतीत चुंबकीय शक्तीचा विचार आहे. त्या शक्तीचा उपयोग करुन शरीर आणि मेंदू यांना प्रभावित केले जाते. बाधित अवयवांचा मेंदूशी संबंध पुर्नप्रस्थापित करुन रुग्णांना बरं करणं ही थेरपी. मेंदू, शरीर आणि चुंबकीय शक्ती या तिघांचा मिलाफ म्हणजे वासा उपचार थेरपी आहे.


सेरिब्रल पाल्सी नॉर्मल होऊ शकणार नाही का? मेंदुला बाधा कशामुळं निर्माण झाली? याचा शोध घेऊन डॉ. वासा रुग्णांना व्यायामप्रकार ठरवून दिले जातात.




विविध देशात रुग्णसेवा


व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रशिया, अमेरीका, इंग्लंड, स्वीडन, आफ्रिका अशा विविध देशात डॉ.वासा रुग्णसेवा देतात. जगभरात वासांची ही कन्सेप्ट वापरली जातेय. सध्या फिनलँड, स्वीडनमधले 6 डॉक्टर आणि 3 मेंदुबाधित रुग्ण उपचारासाठी नाशिकच्या या केंद्रात दाखल झाले आहेत.


मोफत सेवा


डॉ.वासा यांचं सातपूर भागातलं हे उपचार केंद्र सध्याचं जगातलं एकमेव पूर्णवेळ केंद्र असून इथे रुग्णांना अगदी मोफत सेवा दिली जाते. डॉक्टरांशिवाय घरच्या घरी उपचार घेता यावेत, यासाठी रुग्णांच्या पालकांना ट्रेनिंगही दिलं जातं. या उपचार केंद्राला भारत विकास परिषद आणि नगरसेवक सलीम शेख यांची मदत लाभतेय.


मुंबईत भाड्याचा हॉल घेऊन दर रविवारी डॉ. वासा रुग्ण तपासणी करतात.


मेंदुबाधित आजार हे असाध्य मानले जातात.. या रुग्णासाठी फारशा गुणकारी उपचार पध्दती आजच्या मितीला उपलब्ध नाही. किंवा ज्या आहेत त्या खूप खर्चिक आणि वेळखाऊ आहेत. रुग्णांचे हाल पाहूनच या उपचार पध्दतीच्या निर्मितीची कल्पना सुचली. सध्याचे डॉक्टर फक्त जे विद्यापीठांमध्ये शिकवलं तेच उपचार करतात. पण निसर्गाने दिलेली शिकवण मी वापरली आणि पुढे जी उपचार पध्दती निर्माण झाली ती दैवी देणगी असल्याची प्रतिक्रिया डॉ. वासा यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.




डॉ. वासा यांनी प्रशिक्षित केलेले 10-12 असिस्टंट त्यांना याकामी मदत करतात. भारत विकास परिषद आणि सलीम शेख यांच मोलाचं सहकार्य त्यांना याकामी लाभतंय. डॉ.राजूल वासा मेंदु शास्त्रज्ञ आहेत.. वर्षानुवर्षे उपचार करुनही ज्यांना फरक पडला नाही त्यांना वासा यांच्या उपचार पध्दतीचा फायदा झालाय.


युरोपातील सर्वश्रेष्ठ उपचार केंद्र असलेल्या स्वीडनमधील उमीयो स्ट्रोक सेंटरमध्येही वासा कन्सेप्ट वापरली जातेय. तिथे वासा उपचार पध्दतीवर संशोधनही सुरु आहे.. फ्रान्समध्येही शास्त्रज्ञ ख्रिश्चन बेयट हे संशोधन पर प्रबंध लिहताय. मेंदुबाधित रुग्णांसाठी डॉ.वासा यांच कार्य हे संजीवनी देणारं आहे.