Danushka Gunathilaka Arrested : श्रीलंकन क्रिकेटपटू दनुष्का गुणतिलाका (Sri Lankan Cricketer Danushka Gunathilaka Arrested) याला बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीमसह (Sri Lanka Cricket Team) गुणतिलाका हा ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी दाखल झाला आहे. गुणतिलाकाने 2 नोव्हेंबर रोजी महिलेवर अत्याचार केला असल्याची माहिती आहे. त्यानंतर महिलेच्या तक्रारीनंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली आहे. दनुष्का गुणतिलाका याच्या विरोधात 29 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिलेच्या निवासस्थानीच दनुष्काने तिच्यावर अत्याचार केला.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. अॅपवर दोघांमध्ये चॅटिंग झाल्यानंतर त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. दनुष्का गुणतिलाका हा पीडित महिलेच्या घरी दोन नोव्हेंबर 2022 रोजी गेला होता. त्याचवेळी त्याने अतिप्रसंग केला असल्याची तक्रार आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घराची तपासणी केली. चौकशी आणि तपासानंतर दनुष्काला सिडनीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. या ठिकाणी श्रीलंकन संघाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छेविरोधात लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली.
दुखापत झाल्याने संघातून बाहेर
टी-20 विश्वचषक स्पर्धेत दनुष्का गुणतिलाका हा श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. मात्र, तो फक्त एकच सामना खेळू शकला. नामिबियाविरोधात त्याने एकमेवक सामना खेळला. त्यानंतर जखमी झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याऐवजी अशीन बंदारा याचा समावेश श्रीलंकेच्या संघात करण्यात आला होता. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याला संघासोबत ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता.
दनुष्का गुणतिलाका हा डावखुरा फलंदाज असून त्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 2500 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. गुणतिलाकाने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दनुष्का गुणतिलाकाने 47 वनडे, 46 टी-20 सामने आणि आठ कसोटी सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने वनडे मध्ये दोन शतकं झळकावली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या