Raju Shetti : ऊस तोडणी मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार (sugarcane transporter) अडचणीत आले आहेत. त्यामुळं गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळानं मजुरांची जबाबदारी घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेट्टी बोलत होते. मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं वाहतूकदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक वाहतूक दारांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
 
ऊस हंगामात मुकादम आणि ऊसतोड मजुरांकडून ऊस वाहतूकदारांची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. यावर्षी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक ऊस वाहतूकदारांना मुकादम आणि ऊसतोड मजुरांनी गंडा घातला आहे. त्यातच ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका वाहतूकदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना देखील घडली आहे. या सगळ्या प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटना आक्रमक झाली आहे..ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीबाबत शासन स्तरावर ठोस धोरण ठरवलं जावं यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (5 नोव्हेंबर) ऊस वाहतूकदारांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये शेकडो वाहतूकदार सहभागी झाले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी देखील यात सहभागी झाले होते.


गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ अंतर्गत मजुरांची जबाबदारी महामंडळाने घ्यावी अशी आग्रही मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली. त्याचबरोबर या फसवणुकी विरोधात ऊस वाहतूकदार ट्रॅक्टरसह यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील समाधीस्थळी मोर्चा काढणार असल्याचे ऊस वाहतूकदरांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. ऊस वाहतूकदारांचा प्रश्न  हा अत्यंत गंभीर झाला असून, एका वाहतूकदारास सात लाखापासून ते 35 लाखापर्यंत फसवणूक झालेली आहे. या फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाई करण्याची  मागणी यावेळी करण्यात आली. राज्य सरकारनं तातडीने गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळाकडून ऊस वाहतूकदारांना मजूर पुरवणं गरजेचे असल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील , पृथ्वीराज पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हयातील ऊस वाहतूकदार उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा; राजू शेट्टी यांची वैद्यमापन नियंत्रकांकडे मागणी