SRH vs RR IPL 2020 : दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2020) 13 व्या सीजनच्या 26 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला पाच गडी राखून पराभूत केले. राजस्थानकडून राहुल तेवतिया आणि रियान परागने अखेरच्या षटकात बाजी पलटवत विजयश्री खेचून आणला म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हैदराबादने दिलेलं 159 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीचे फलंदाज बेन स्टोक्स आणि जोस बटलर स्वस्तात परतल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ देखील 5 धावांवर धावचीत झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि रॉबिन उथप्पा यांनी डाव सावरला. संजूने 26 धावा तर रॉबिनने 18 धावा काढाल्या. मात्र, रियान पराग आणि राहुल तेवातिया यांनी अखेरच्या काही षटकात तुफान फटकेबाजी करत विजय खेचून आणला.
राजस्थानकडून रियान परागने 26 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या आणि राहुल तेवतियाने 28 चेंडूत चार चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 45 धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून खलील अहमद आणि रशीद खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, हैदराबाद सनरायजर्स नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीरकारली. हैदराबादच्या संघाकडून जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर ही जोडी सलामीसाठी आली. पण, राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये या जोडीला जखडून ठेवले. जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाल या दोघांनी 4 षटकांत बेअरस्टो-वॉर्नरला जोडीला केवळ 13 धावाच करून दिल्या. अशातचं फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बेअरस्टो 16 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे या जोडगोळीने चांगली भागीदारी केली. वॉर्नरने 38 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 48 धावा केल्या. तर मनिष पांडेने 44 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांच्या सहाय्याने 54 धावा केल्या. शेवटच्या काही षटकांमध्ये केन विल्यमसनने 12 चेंडूत 2 षटकार खेचत नाबाद 22 धावा जमवल्या. परिणामी हैदराबादच्या संघाने 20 षटकांत 158 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट या तिघांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.