श्रीशांत पुन्हा टीम इंडियात परतणार?
एबीपी माझा वेब टीम | 07 Feb 2017 11:35 AM (IST)
नवी दिल्ली: आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अडकल्यानंतर मैदानाबाहेर असलेला एस श्रीशांत पुन्हा एकदा भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. कारण बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनीच तसे संकेत दिले आहेत. नुकतंच बीसीसीआयने श्रीशांतला झटका देत, स्कॉटलंड क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. मात्र आता बीसीसीआय उपाध्यक्ष टीसीबी मॅथ्यू यांनी श्रीशांतच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे. "जर आशिष नेहरा 37 व्या वर्षी टीम इंडियात पुनरागमन करु शकतो, तर श्रीशांतचीही शक्यता आहे. 33 वर्षीय श्रीशांत हा अजूनही उपयुक्त गोलंदाज आहे. तो कमबॅकसाठी घाम गाळतोय", असं मॅथ्यू म्हणाले. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर, बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने 2013 मध्ये श्रीशांतवर क्रिकेट खेळण्यासाठी आजीवन बंदी घातली होती. दिल्ली पोलिसांनी श्रीशांतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा दाखल केला होता. मात्र दिल्ली न्यायालयाने श्रीशांतची निर्दोष मुक्तता केली होती. पण बीसीसीआयने घातलेली बंदी अद्याप कायम आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआय संबंधित कोणत्याही क्रिकेटमध्ये खेळण्यास मनाई आहे, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.