अहमदाबाद : पाणी पुरीच्या पाण्यामध्ये टॉयलेट क्लिनर वापरल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या विक्रेत्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाणीपुरीची चव वाढवण्यासाठी विक्रेता चेतन नान्जी पाण्यात टॉयलेट क्लिनर मिसळत असे.
हे प्रकरण 2009 मधील. अहमदाबादच्या लाल दरवाजा परिसरातील एक पाणीपुरी विक्रेता पाण्यात टॉयलेट क्लिनर वापरत असे.
लाल दरवाजामधील पाणीपुरी विक्रेता चेतन नान्जी पाण्यात काहीतरी मिसळत असल्याची तक्रार अहमदाबाद नगर निगमध्ये आली होती. तसंच तो त्याची गाडी गटारच्या शेजारीच लावतो. शिवाय आजूबाजूचा परिसर फेकलेल्या पाणीपुरी आणि उरलेल्या पाण्यामुळे अस्वच्छ होत आहे, असंही तक्रारीत म्हटलं होतं.
यानंतर अहमदाबाद नगर निगमने पाणीपुरीचे नमुने घेतले आणि तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.
प्रयोगशाळेतील अहवालातून जे समोर आले, त्यामुळे कोणालाही धक्का बसेल. विक्रेता पाणीपुरीच्या पाण्यात असं अॅसिड मिसळत, जे टॉयलेट क्लिनरमध्ये वापरलं जातं. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर विशेष कोर्टाने विक्रेता चेतन नान्जीविरोधात भेसळीचा खटला दाखला केला. चेतन नान्जी दोष ठरल्याने त्याला सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रतिवादादरम्यान चेतन नान्जी म्हणाला की, मला दोषी ठरवण्यासाठी कोर्टाकडे कोणतेच पुरावे नाहीत. त्यामुळे माझी मुक्तता करावी. पण वकिलांनी साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारावर दावा केला की, बरेच लोक पाणीपुरी खातात. त्यामुळे अशी भेसळ म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळ आहे. भेसळयुक्त पाणी लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने दोषी विक्रेत्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावली.
पाच वर्षांपूर्वी ठाण्यातील एक पाणीपुरी विक्रेता पाण्यात लघुशंका करत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. अंकिता राणे नावाच्या तरुणीने तिच्या इमारती बाहेरील रस्त्यावर पाणीपुरीवाल्याला लोट्यात लघुशंका करताना पाहिले. या किळसवाण्या प्रकाराचे चित्रीकरण करून पाणीपुरीवाल्याचे बिंग फोडलं होतं.