आजीला नातीचं आव्हान, मनमाडमध्ये रंगतदार लढत
एबीपी माझा वेब टीम | 07 Feb 2017 08:27 AM (IST)
मनमाड : राजकारणाच्या आखाड्यात नातीगोती नेहमीच चर्चेत राहिली आहेत. कधी घराणेशाहीच्या वादावरुन, तर कधी घरातल्याच व्यक्ती एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यावरुन. नातवंडं म्हणजे आजी-आजोबांसाठी जणू दुधावरची साय. मात्र मनमाडमध्ये एका चुरशीच्या लढतीत आजी आणि नात एकमेकींविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मनमाडमधील न्यायडोंगरीमध्ये 65 वर्षीय आजी आणि 25 वर्षीय नात यांच्यात लढत होणार आहे. न्यायडोंगरीमधलं आहेर घराणं हे काँग्रेसचे कट्टर समर्थक म्हणून ओळखलं जातं. मात्र माजी पंचायत समिती सभापती विजयाताई आहेर यांनी काही दिवसांपूर्वी हातावर शिवबंधन बांधलं. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली आहे, तर विजयाताई यांची नात अश्विनी आहेरला काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. अश्विनी यांचे वडील तर विजयाताई यांचे सुपुत्र अनिल आहेर हे माजी आमदार आहेत.