पोर्ट एलिझाबेथ : विश्वचषकापूर्वी मिळालेल्या पराभवाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची पोलखोल केली आहे. वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील मैदानांवर भारतीय फिरकीपटूंनी धुरा सांभाळली आहे.


लेग स्पिनर यजुवेंद्र चहलने पाच सामन्यात 14, तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 16 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटू जोडीचं कोडं अजूनही उलगडलेलं नाही. त्यामुळे भारताकडून पहिल्यांदाच मायदेशात पराभव स्वीकारावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांना विश्वचषकाची चिंता सतावू लागली आहे.

दरम्यान, विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार आहे आणि तिथे फिरकीपटूंना मदत मिळत नाही, या आशेने दक्षिण आफ्रिकेचा संघ स्वतःला दिलासा देत आहे. फलंदाजांची परिस्थिती पाहून गिब्सन यांनी मान्य केलं आहे, की भारताकडे जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. मात्र इंग्लंडमध्ये ते एवढे फायदेशीर ठरतील, असं वाटत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

''भारताकडे दोन जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत आणि ते कुठेही चेंडू वळवू शकतात. मात्र याचा सामना करण्याची तयारी करण्यासाठी आमच्याकडे अजून पूर्ण वर्ष बाकी आहे. मात्र या गोलंदाजांना इंग्लंडमध्ये एवढी मदत मिळेल असं वाटत नाही,'' असं गिब्सन म्हणाले.

सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत भारत 4-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे गिब्सन पराभवामुळे नाराज आहेत. ''ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना सांगितलं होतं, की पराभवाला काहीही कारण देता येणार नाही, फक्त आपण चांगला प्रयत्न करु शकतो. मात्र या पराभवाने आम्हाला पुढचा विचार करण्यास भाग पाडलं आहे,'' असं गिब्सन म्हणाले.

''आमचं सर्व लक्ष सध्या विश्वचषकावर आहे, हे मलाही माहिती आहे. मात्र आज जो संघ आहे, तोच विश्वचषक खेळण्यासाठी जाणार नाही,'' असंही गिब्सन यांनी सांगितलं.

विराट कोहलीच्या टीम इंडियाने पोर्ट एलिझाबेथची पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली.

संबंधित बातम्या :

VIDEO : सामन्याला कलाटणी देणारा पंड्याचा भन्नाट 'थ्रो'


धोनीने घेतलेला DRS निर्णय चुकला, सोशल मीडियावर ट्रोल


भारताने द. आफ्रिकेत वाईट इतिहास पुसत नवा इतिहास रचला