इस्लामाबाद : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारताने पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळू नये, अशी मागणी देशभरातून होत आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेदेखील हीच मागणी मांडली. पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याबाबत म्हणाला की, "गांगुली असे वक्तव्य करुन पब्लिसिटी स्टंट करु पाहतोय. त्याला निवडणुकीला उभे राहायचे आहे."

मियाँदाद म्हणाला की, "सौरव गांगुली लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहे. त्यामुळे तो माध्यमांचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी गांगुली पब्लिसिटी स्टंट करतोय. गांगुलीच्या अशा वक्तव्याने क्रिकेटला काहीही फरक पडणार नाही."

दरम्यान गांगुलीने पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये असे मत मांडले होते. पाकिस्तानला आंतराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्यासाठी भारताने ठोस पावलं उचलावी, असा सल्लादेखील त्याने बीसीसीआय आणि भारत सरकारला दिला होता.

पाकिस्तानला क्रिकेटमध्ये एकटं पाडण्यासाठी बीसीसीआयदेखील प्रयत्नशील आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानसोबत सामना खेळणार नाही, यासाठी बीसीसीआय आयसीसीकडे मागणी करणार असल्याची चर्चा रंगतेय. याबाबत मियाँदाद म्हणाला की, बीसीसीआयचं हे वागणं बालिशपणाचं आहे.