पंढरपूर : "आगामी निवडणुकीत जर मोदी जिंकले तर ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. आज पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी माजी नारायण राणे हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. दोन माजी मुख्यमंत्री मेळाव्याला उपस्थित असूनही शेतकरीवर्गाने मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे रिकाम्या खुर्च्यांवरून दिसत होते.

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ही देशातली शेवटची निवडणूक ठरेल, असे सांगताना शिंदे यांनी मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या मेळाव्यात शिंदे यांचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आणि सध्या युतीत असलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनीदेखील यावेळी भाषण केले. या भाषणातून त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शहाजीबापू शिंदे यांना म्हणाले की, "मागील निवडणुकांच्या वेळी वीजबिलमाफीची घोषणा करुन तुम्ही निवडणूक जिंकलात. परंतु त्यानंतर एक महिन्यांनी बिले येणे पुन्हा सुरु झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेते फक्त विरोधात असल्यावरच बोलतात, सत्तेवर असताना त्यांना या गोष्टींसाठी वेळच नसतो."

वाचा : काम करुन निवडून येणं खोटं, नाहीतर मी आणि सुशीलकुमार शिंदे हरलो नसतो : नारायण राणे

या मेळाव्यात नारायण राणे म्हणाले की, "चांगली कामे करून निवडून येता येते, यावर माझा विश्वास राहिलेना नाही. तसे असते तर आयुष्यभर लोकांची कामे करणारे मी आणि सुशीलकुमार शिंदे निवडणुकीत कधीच पराभूत झालो नसतो."