कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर टॅक्सीतून प्रवास करण्याची वेळ आली. कोलकातामधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तो पिवळ्या रंगाच्या अॅम्बेसेडर टॅक्सीतून पोहोचला. हे चित्र सुरक्षारक्षकांसाठी नवं होतं.


खरंतर गांगुलीकडे अनेक गाड्या आहेत. तो बऱ्याचदा बीएमडब्लूमधून प्रवास करतो. पण आज बीसीसीआयच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी तो चक्क टॅक्सीतून हॉटेलमध्ये पोहोचला.

झालं असं की, बैठकीसाठी तो आवडत्या बीएमडब्लू कारमधून निघाला होता. पण रस्त्यातच कार बिघडली. बीएमडब्लू एक्साईट क्रॉसिंगजवळच्या ली रोडवर खराब झाली. त्यानंतर गांगुली गाडीतून उतरला. मागून येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या टॅक्सीत तो बसला आणि बैठकीसाठी निघाला.

माजी कर्णधाराला पंचतारांकित हॉटेल परिसरात सामान्य टॅक्सीतून उतरताना पाहून सुरक्षारक्षकही चक्रावले. बंगाल क्रिकेट संघाचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने त्यांनतर बीसीसीआयच्या तांत्रिक समितीच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं.