मुंबई : रशियात शेकडो मुलांच्या जीवावर उठलेला 'ब्ल्यू व्हेल' हा ऑनलाईन गेम भारतात हातपाय पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतल्या अंधेरीत 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्यानंतर भारतीय पालक खडबडून जागे झाले आहेत. मात्र या गेमचा मास्टरमाईंड असलेला अवघ्या 22 वर्षांचा तरुण धक्कादायक गोष्टी उघड करत आहे.

ब्ल्यू व्हेल चॅलेंज या व्हायरल झालेल्या ऑनलाईन गेममुळे जगभरात अनेक टीनएजर्सनी आपलं आयुष्य संपवलं आहे. विघातक 50 टास्क्स पार केल्यानंतर या गेमचा अंतिम टप्पा म्हणजे सुसाईड.

फिलीप बुडेकिन उर्फ फिलीप लिस (फॉक्स) या 22 वर्षांच्या रशियन तरुणाने हा गेम तयार केला आहे. सोशल
मीडियावर तरुणांशी मैत्री केल्यानंतर तो त्यांचा ब्रेनवॉश करतो. या गेमच्या निर्मितीमागील त्याने सांगितलेलं कारण अत्यंत धक्कादायक आहे. पृथ्वीवरील जैविक कचरा (biological waste) स्वच्छ करण्यासाठी हा घाट
घातल्याचं तो सांगतो.

‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या


फिलीपला महिन्याभरापूर्वीच बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठवण्यात आला आहे. साऊंड इंजिनिअरिंग आणि मानसशास्त्राचं तीन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. फिलीपला बायपोलर डिसॉर्डर झाल्याचं निदान आहे. इतकंच नाही, तर लहानपणी आई आणि मोठा भाऊ मारहाण करत असल्याचंही त्याने सांगितलं.

'पृथ्वीतलावर काही माणसं असतात, तर काही जैविक कचरा. त्यांच्यामुळे समाजाला काहीही फायदा होत नाही. अशा व्यक्ती समाजाला त्रासदायकच ठरतात. मी अशा माणसांची समाजातून सफाई करत आहे.' असं फिलीप म्हणतो.

ब्लू व्हेल गेम विधानसभेत, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर


किशोरवयीन मुलांना रात्रभर जागरण करायला लावायचं. असं केल्यास त्यांचं मन सहजरित्या प्रभावाखाली येतं, असा दावा फिलीपने केला. त्यांना मायेची ऊब आणि सामंजस्याची वागणूक दिल्याने अशा मुलांना बरं वाटतं, असंही तो म्हणतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक तरुणी त्याला लव्ह लेटर्स लिहित आहेत.

सर्व आत्महत्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेममुळे झाल्याचा फिलीपने इन्कार केला. फक्त 17 सुसाईड्सचा थेट संबंध या
खेळाशी आहे. मात्र उर्वरित तरुणांनी आपल्या प्रभावाखाली आत्महत्या केली नसल्याचं तो म्हणतो. आणखी 28 मुलं आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचंही त्याने सांगितलं.

काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम?

ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक ‘मास्टर’  मिळतो मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळं खेळणारे नैराश्याच्या गर्तेत जातात अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात.

संबंधित बातम्या


‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या


जीवघेण्या ‘ब्लू व्हेल’ गेममुळे 130 मुलांची आत्महत्या?