Shivraj Rakshe Exclusive Interview : अहिल्यानगर शहरामध्ये पार पडलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सामन्यानंतर पंचांसोबत घातलेली हुज्जत आणि पंचांना केलेली मारहाण शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) आणि महेंद्र गायकवाड यांना भोवली आहे. या दोन मल्लांच्या कुस्तीवर तीन वर्षाची बंदी आणण्यात आली आहे. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या दोघांच्या कुस्तीतील निर्णय पंचांनी चुकीचा दिला आणि दाद मागायला गेल्यानंतर चांगला प्रतिसाद न देता शिवीगाळ झाल्यामुळे सगळा प्रकार घडल्याचं शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांनी म्हटलं आहे. एवढेच नाही तर घडलेला प्रकार हा चुकीचा आहे आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील राक्षे (Shivraj Rakshe) यांनी म्हटलं आहे, शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यानी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, दाद मागायला गेल्यावर शिवीगाळ झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
त्यानंतर मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं...
एबीपी माझाशी बोलताना राक्षे यानी म्हटलं की, मी काही आज पहिल्यांदा स्पर्धा खेळत नाही. गेली पंधरा वर्षे मी तालीम क्षेत्रात आहे. त्याचबरोबर लाल मातीशी माझं चांगलं नातं आहे. या लाल मातीनं बरंच काय दिलं. आता विषय आहे तो म्हणजे, जर मल्लाचे दोन्ही खांदे जर प्रतिस्पर्ध्यांचे टेकले नाही. तर त्यावर तुम्ही आधीच निर्णय देत आहात की, कुस्ती झाली म्हणून. आम्ही तिथं आपील करतो आहोत, आपीलची बाजू देखील तुम्ही फेटाळून लावता. पंचाचा काही हेवादेवा करण्याचा काही संबंध नव्हता. परंतु आम्ही जो अपील मांडला त्यावर तुम्ही काहीच बोलला नाहीत. त्यानंतर खालून मला शिवीगाळ झाली. त्यानंतर मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं, असं राक्षे यानी म्हटलं आहे.
तिथं नेमकं काय घडलं?
कुस्तीत हार जीत होत असते. त्याबद्दल काही नाही. परंतु जर प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे जर टेकलेले असते आणि त्यानंतर दहा सेकंद होल्ड करावा लागतं, त्यानुसार मग ती कुस्ती दिली जाते. परंतु माझा एकच शोल्डर टेकलेला होता. दुसरा शोल्डर तर वरतीच होता. तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता. काल पंचांनी त्यांची चूक पण मान्य केलेली आहे. पंचांचा हा निर्णय चुकीचा झालेला आहे. काल वस्ताद म्हणाले, आम्ही दोन वर्ष अन्याय सहन केला, आणखी किती वर्ष मुलांनी हा अन्याय सहन केला पाहिजे. पैलवान सोबत अशी घटना घडत गेली पंचांचा निर्णय दरवेळी असा चुकीचा राहिला तर एखाद्या खेळाडूचं मोठं नुकसान होतं. गरीब घरातला हा खेळाडू असतो. वर्षभर केलेली त्याची मेहनत असते. त्यामागे त्याचा खर्च झालेला असतो. ते पण त्यांना दिसत नाही का? ते सहज बोलून टाकतात पंचांची चुकी झाली. ती चूक त्यांनी आधी का मान्य केली नाही. आधी चूक मान्य केली असती तर परत कुस्तीचे जे पॉईंट आहे,, ते देऊन कुस्ती पुन्हा चालू करावी लागली असती, असंही पुढे शिवराज राक्षे यानी म्हटलं आहे.
मी रिव्ह्यू मागत असताना मला शिवीगाळ
माझं मोठं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणी पंचांवर देखील कारवाई केली पाहिजे. काल पंचांनी मान्य केलं आहे त्यांची चुकी झाली आहे, ती चुक त्यांनी काल मान्य केली असती. तर प्रकरण इतकं वाढलं नसतं. तुम्ही खालून शिवीगाळ करत असाल तर कोणता पैलवान हे सहन करेल, याचा सवाल देखील राक्षे यांनी एबीपी माझाशी बोलताना उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी कोर्टात जाण्याबाबतही त्याचं म्हणणं मांडलं आहे. मी रिव्ह्यू मागत असताना मला शिवीगाळ झाली. मी वारंवार त्यांच्याकडे विनंती करत होतो. तुम्ही रिव्ह्यू दाखवा, म्हणून पण त्यावेळी ते टाळाटाळ करत होते, नंतर चिडून त्यांनी मला शिवी दिली. शेवटी मग मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागला,असंही पुढे शिवराज राक्षे यानी म्हटलं आहे.
अन्याय झाल्यानंतर कोणता पैलवान शांत बसेल?
अन्याय झाल्यानंतर कोणता पैलवान शांत बसेल, त्याची त्यामागे वर्षभराची मेहनत आहे. त्यानंतर तो पण पंचांना काहीतरी बोलेलच ना. पैलवान काही इतका वेडा नाही, उठ सुट कोणालाही उठून बोलेल किंवा मारेल. पंच जर तशी चुकी करत असतील तर त्यानुसार पैलवान देखील त्यांना बोलणार. गरीब कुटुंबातील पैलवानांवरती अन्याय होतो, त्याला कोणी वाचा फोडत नाही. त्यामुळे पैलवानांचा नुकसान होत आहे. पंच सहज बोलून जातात. पण, यामागे मोठं नुकसान होतं. काल जर त्यांनी व्हिडिओ दाखवून सगळ्या गोष्टींचा निवारण केलं असतं, तर आज इथपर्यंत ही गोष्ट वाढली नसती. ज्याप्रमाणे पैलवानांवर कारवाई होते, त्याप्रमाणे पंचांवर देखील कारवाई केली पाहिजे. एखाद्या पंचांनी पैलवानाबद्दल निर्णय घेताना 50 वेळा विचार केला पाहिजे. मी कोर्टात धाव घेणार आहे, असंही शिवराज राक्षे यानी म्हटलं आहे.