Maharashtra Kesari 2025 Ajit Pawar: बलभिम अण्णा जगताप क्रीडा नगरी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 च्या (Maharashtra Kesari 2025) अंतिम अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा (Mahendra Gaikwad) 2 विरोधात 1 गुणाने पराभव करत विजय मिळवला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यास मानाची चांदीची गदा व 'थार' चारचाकी गाडीची चावी देण्यात आली. यावेळी अजित पवारांनी स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक करत नगरच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही दिला. तर महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांनी आयोजकांना सल्ला देखील दिला आहे. 

अजित पवार काय म्हणाले?

महाराष्ट्र केसरी 2025 च्या या स्पर्धेत मोठी बक्षीस दिली जाणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना थार मोटार, बुलेरो कार तसेच 18 बुलेट, 20 स्प्लेंडर, 30 सोन्याच्या अंगठ्या अशी बक्षीस दिली जाणार आहे. मला कुठे पाहायला मिळाली नव्हती, असं अजित पवार म्हणाले. तसेच पुढच्या वेळेस जे स्पर्धा घेणार आहेत त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग नंतर स्पर्धा घ्यावी. कारण शेवटी हा पायंडा पडतो, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

राज्य सरकार आर्थिक मदत करण्याच्याबाबतीत कमी पडणार नाही- अजित पवार

माझ्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दत्ता भरणे, राधाकृष्ण विखे पाटील सगळे मिळून यापुढी कोणतीही स्पर्धा असेल, कोणताही खेळ असेल, त्याबाबत राज्य सरकार आर्थिक मदत करण्याच्याबाबतीत कमी पडणार नाही, असं आश्वासन देखील अजित पवारांनी दिलं. 

संपूर्ण महाराष्ट्राला पृथ्वीराजचा सार्थ अभिमान- अजित पवार

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत अभिनंदन केले आहे. अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या 'महाराष्ट्र केसरी 2025' स्पर्धेच्या अंतिम सामन्याप्रसंगी उपस्थित राहिलो. या स्पर्धेत पुण्याचा सुपुत्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळ यानं महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला, मानाची गदा जिंकली. या उत्तुंग यशाबद्दल मी पृथ्वीराजचं मनापासून अभिनंदन करतो, त्याला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. यासारख्या रोमांचक खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीचं जतन केलं जातंय, याचं समाधान वाटतं. त्याचप्रमाणे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देखील मिळते. संपूर्ण महाराष्ट्राला पृथ्वीराजचा सार्थ अभिमान आहे, असं अजित पवार म्हणाले. 

संबंधित बातमी:

Maharashtra Kesari 2025: शेवटचे 16 सेकंद, आधी वाद, मग लाथ; आंदोलन अन् स्पर्धा संपताच पोलिसांचा लाठीचार्ज, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील A टू Z स्टोरी