दुबई : आशिया चषकातील सुपर फोर सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्माने मोठ्या विक्रमाची नोंद केली. शिखर आणि रोहितने पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी सलामीची भागीदारी करण्याचा विक्रम केला.


आशिया चषकात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी झाली, ज्यामध्ये शिखर धवनने 114 धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने 95 धावांचं योगदान दिलं. धवनने त्याच्या खेळीत 16 चौकार आणि दोन षटकार ठोकले, तर धवन बाद होईपर्यंत रोहितने सात चौकार आणि तीन षटकार ठोकले होते.

रोहित आणि शिखरपूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर होता. सचिन आणि गांगुली या जोडीने 1998 साली पाकिस्तानविरुद्ध सलामीला 159 धावांची भागीदारी केली होती.

एवढंच नाही, तर आशिया चषकाच्या इतिहासात कोणत्याही सलामीवीर फलंदाजांनी केलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

जगातील सर्वात मोठी सलामीची भागीदारी

फखर जमान (210) आणि इमाम उल हक (113) – 304 वि. झिम्बाम्ब्वे

उपुल थरंगा (109) आणि सनथ जयसुर्या (152) – 286 वि. इंग्लंड

डेव्हिड वॉर्नर (179) आणि ट्रॅव्हिस हेड (128) – 284 वि. पाकिस्तान

हाशिम आमला (110) आणि क्विंटन डीकॉक (168) – 282 वि. बांगलादेश

उपुल थरंगा (133) तिलकरत्ने दिलशान (144) – 282  वि. झिम्बाम्ब्वे