मुंबई : श्रेयस अय्यर आणि सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ यांच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबई संघाने विजय हजारे ट्रॉफीच्या अ गटातील सामन्यात रेल्वे संघाविरुद्ध 50 षटकात पाच बाद 400 धावा केल्या. या सामन्यात मुंबईने रेल्वेवर 173 धावांनी मात केली.


श्रेयस अय्यरने 118 चेंडूमध्ये 144 आणि पृथ्वी शॉने 81 चेंडूत 129 धावा केल्या. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या रेल्वेचा डाव 42.4 षटकात 227 धावांवर आटोपला. मुंबईकडून शम्स मुलानीने 26 धावा देऊन तीन विकेट घेतल्या. मुंबईचा हा सलग तिसरा विजय होता.

भारतीय डोमेस्टिक वन डे क्रिकेटमध्ये 400 धावांचा आकडा गाठणारा मुंबई दुसरा संघ आहे. यापूर्वी 2010 मध्ये मध्य प्रदेशने रेल्वेविरुद्ध सहा बाद 412 धावा केल्या होत्या.

मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे तीन धावा करुन माघारी परतला. त्यानंतर अय्यर आणि पृथ्वीने दुसऱ्या विकेटसाठी 20 षटकात 161 धावांची भागीदारी केली. पृथ्वी शॉने 61 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं, ज्यामध्ये सहा षटकार आणि 14 चौकारांचा समावेश होता. तर अय्यरने आठ चौकार आणि दहा षटकार ठोकले.

ही भागीदारी मोडित काढल्यानंतर आलेलया सूर्यकुमार यादवने 67 आणि सिद्धेशने नाबाद 30 धावा केल्या. रेल्वेकडून कर्णधार सौरव वाकासकरने 48, प्रशांत अवस्थीने 41 आणि अंकित यादवने नाबाद 35 धावा केल्या. मात्र त्यांना मुंबईने दिलेलं आव्हान गाठता आलं नाही.

महाराष्ट्राचा पंजाबवर 94 धावांनी विजय

अ गटातील दुसऱ्या एका सामन्यात अंकित बावने (100) च्या शतकी खेळीच्या बळावर आणि सत्यजीत बच्चावच्या पाच विकेटमुळे महाराष्ट्रने पंजाबवर 94 धावांनी मात केली. महाराष्ट्राने 50 षटकात 281 धावा केल्यानंतर पंजाबचा डाव 40.3 षटकांमध्ये 187 धावांवर आटोपला.

अंकित बावनेशिवाय नौशाद शेखने 60 चेंडूत 60 धावांची खेळी केली. महाराष्ट्राने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा कोणताही फलंदाज तग धरु शकला नाही. शुभमन गिल केवळ 36 धावा करुन बाद झाला, तर मनन वोहरा 27 आणि युवराजने फक्त सहा धावा केल्या.

पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्मात

मुंबईकर पृथ्वी शॉ दमदार फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकं केली आहेत. बडोद्याविरुद्ध त्याने 66 चेंडूत 148.48 च्या स्ट्राईक रेटने 98 धावा केल्या. त्यानंतर कर्नाटकविरुद्ध 53 चेंडूत 60 आणि रेल्वेविरुद्ध 81 चेंडूत 129 धावा केल्या.