नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान वेस्टइंडिजला 84 धावांना पराभूत करून टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेची सुरूवात धडाक्यात केली आहे. भारतीय महिलांनी 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या कामगिरीसह 15 वर्षीय शेफाली वर्माने मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेल्या विक्रम मोडण्याचा पराक्रम केला आहे. या सामन्यात शेफालीने 49 चेंडूंत 73 धावा केल्या आहे. शेफाली वर्माने सचिन तेंडुलकरचा 30 वर्षाचा जुना विक्रम मोडला आहे. सचिननं 16व्या वर्षी पहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावलं होतं.


भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजी करताना भारताने 20 षटकात 4 बाद 185 धावा केल्या. यजमान वेस्टइंडिज महिला संघाला 20 षटकात 9 बाद 101 धावांपर्यंत मजल मारता आली. शेफालीने 6 चौकार आणि 4 षटकार मारत 73 धावा केल्या. टी-20 क्रिकेटमधील हे तिचे पहिले अर्धशतक आहे. तर स्मृती मानधनाने 46 चेंडूत 11 चौकारांसह 67 धावा केल्या. शेफाली आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावा जोडल्या

वेस्टइंडिजकडून शॅमेने कॅम्पबेलने सर्वाधिक 33 धावा केल्या. हॅली मॅथ्यूजने 13, स्टेसी एन किंगने 13 आणि किशोना नाइटने 12 धावांचे योगदान दिले.