Pro Govinda 2 : प्रो गोविंदा सीझन 2 च्या चषकावर सातारा सिंघमने (जय जवान गोविंदा पथकाने) पुन्हा एकदा आपल्या विजयाची मोहोर उमटवली. विजेत्या संघाला 25 लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा सातारा सिंघमने प्रो गोविंदा सीझन 2 च्या चषकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे या संघावर कौतुकाचा वर्षाव होतोय. यावेळी प्रत्येक गोविंदा पथकांनी उत्कृष्टपणे आपले कौशल्य दाखवत उपस्थितांची मनं जिंकली. अवघ्या 33.39 मिनिटात थर रचत सातारा सिंघमने बाजी मारली.
प्रो गोविंदा सीझन 2 च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक कोल्हापूर किंग्ज (बालवीर गोविंदा पथक),
तृतीय पारितोषिक लातूर लेजंट्स (यश गोविंदा पथक),
चौथे पारितोषिक अलिबाग नाईट्स (श्री आग्रेश्वर गोविंदा पथक) संघाला घोषित करण्यात आले.
यांना अनुक्रमे 15 लाख रुपये, 10 लाख रुपये, 5 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
उर्वरित संघांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
....तेव्हा तानाजी मालुसरे चढत आहेत की काय असं वाटलं - मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला, ते म्हणाले, प्रो गोविंदा सीझन 2 मध्ये सहभागी झालेल्या सर्व गोविंदा पथकांचे मनापासून अभिनंदन करतो. मराठी मातीतला खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतोय याचा मला अभिमान आहे. यामागे माझे सहकारी आमदार प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचे फार मोठे श्रेय आहे. हे दोघेही प्रो गोविंदाचे पाईक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्वर्गीय आनंद दिघे यांनी दहीहंडी खेळाला व्यापक स्वरुप दिले. त्यांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. सातारा सिंघम जेव्हा थरावर चढत होते तेव्हा तानाजी मालुसरे चढत आहेत की काय असं वाटतं होते, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
स्पेनलाही गोविंदा पथक सलामी देण्यासाठी जाणार
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रो गोविंदा खेळाची व्यापकता वाढवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 75 हजार गोविंदांचे विमा काढण्यात आले. गोविंदा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करा, मात्र हा गोविंदा अपघात मुक्त करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच स्पेनलाही आपले गोविंदा पथक सलामी देण्यासाठी जाणार आहे यासाठी दहीहंडी समन्वय समिती खूप मेहनत घेत आहे असेही ते म्हणाले. प्रो गोविंदा सीझन 2 च्या अंतिम सामान्यात सोळा संघ सहभागी झाले होते.
गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळाले - प्रताप सरनाईक
आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, मी पाहिलेले स्वप्न पुर्वेश सरनाईक आणि त्यांच्या टीमने सत्यात उतरवले. गोविंदा हा खेळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचा आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील गोविंदांना प्रो गोविंदाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळाले. राज्य शासनाने गोविंदा या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश केला. राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे आज हा खेळ एवढ्या मोठ्या व्यासपीठावर होतोय याचा आनंद आहे. भविष्यात गोविंदा या खेळाला नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. तर गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत आम्ही पोहोचवला आहे. मैदानात खेळला जाणारा खेळ आज इनडोअर स्टेडिअममध्ये खेळला जात आहे. तर या व्यासपीठाच्या माध्यमातून गोविंदा खेळ देशभरात पोहचला आहे. भविष्यात हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यास नक्की यश मिळेल, असा विश्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला.