मुंबई : म्हाडाच्या मुंबई (Mumbai MHADA Lottery) मंडळाने नुकतेच 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी सध्या अर्ज प्रक्रिया राबवली जात आहे. मोठ्या संख्येने मुंबईकर या सोडतीसाठी अर्ज भरत आहेत. मात्र अनेक लोकांना हा अर्ज भरताना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन आता म्हाडातर्फे एक विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे लाईव्ह वेबीनारचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेबीनारच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्यांना वेगवेगळ्या तांत्रिक बाबी समजाऊन सांगितल्या जातील.


वेबीनार कधी असणार?


म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार हे वेबिनार 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित केले जाईल. हा वेबिनार लाईव्ह होणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर या वेबीनारची लिंक उपलब्ध आहे. एसएमएसच्या मदतीनेही तुम्हाला या वेबीनारची लिंक मिळेल. तसेच म्हाडाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल तसेच फेसबुक पेजवरही हे वेबीनार लाईव्ह असेल. अर्जदार आपल्या सोईनुसार या वेगवेगळ्या माध्यमातून वेबीनारमध्ये सहभागी होऊ शकतात. 


अर्जदारांना कोणकोणत्या अडचणी येत आहेत?


अर्जदारांना  म्हाडाच्या घरांसाठी  अर्ज करताना वेगेवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. कोणती कागदपत्रे कुठे अपलोड करावीत इथपासून ते वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे अर्जदारांना अर्ज भरण्यास विलंब होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन म्हाडाने हा वेबीनार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त संख्येने या वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन म्हाडाने केले आहे. 


अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा, म्हाडाचं आवाहन


म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलं आहे.


म्हाडा लॉटरीचे सविस्तर वेळापत्रक


* सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरूवात दिनांक व वेळ- दि. ०९/०८/२०२४ दुपारी १२.०० वा. पासून


* अनामत रक्कम भरण्याचा दिनांक व वेळ- दि. ०९/०८/२०२४ दुपारी १२.०० वा. पासून


* ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक व वेळ- दि. ०४/०९/२०२४ दुपारी ३.०० वा. पर्यंत


* अनामत रक्कम भरणा करण्यासाठी शेवटचा दिनांक व वेळ- दि. ०४/०९/२०२४ रात्री ११.५९ वा. पर्यंत


*  सोडतीसाठी प्राप्त अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ- दि. ०९/०९/२०२४ सायंकाळी ६.०० वा.


* प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे/हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळ- दि. १०/०९/२०२४ दुपारी १२.०० वा. पर्यंत


* सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी प्रसिद्धी दिनांक व वेळ- दि. ११/०९/२०२४ सायंकाळी ६.०० वा


* सोडतीचा दिनांक व वेळ-  दि. १३/०९/२०२४ सकाळी ११.०० वा.


* सोडतीचे ठिकाण- नंतर जाहीर करण्यात येईल


हेही वाचा :


मोठी बातमी : म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार, म्हाडा उपाध्यक्षांचं आश्वासन


MHADA Lottery 2024: म्हाडा लॉटरीत मुंबईतील कोणत्या एरियात घरं, मिडलक्लास आणि हायक्लाससाठी कोणत्या एरियात घरं, उत्पन्नाची मर्यादा किती?


MHADA Lottrey : आनंदाची बातमी! मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; गोरेगावमध्ये म्हाडा आणखी 2500 घरं बांधणार