नाशिक : नाशिकच्या संजीवनी जाधवनं जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. तैपेई सिटीत आयोजित या स्पर्धेत संजीवनीनं दहा हजार मीटर्स शर्यतीचं रौप्यपदक जिंकलं. नाशिकच्या संजीवनी जाधव या मराठमोळ्या धावपटूनं दोन महिन्यांमध्ये दोन पदकं मिळवल्यानं तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

वीस वर्षांच्या संजीवनीचं हे दुसरं मोठं यश ठरलं. जुलै महिन्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिनं पाच हजार मीटर्सचं कांस्यपदक पटकावलं होतं. जागतिक शालेय ऑलिम्पियाडमध्येही संजीवनीच्या नावावर एक पदक आहे.

संजीवनी ही मूळची पैलवान आहे. पण नाशिकचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी तिला अॅथलेटिक्सकडे वळवलं आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.