नवी दिल्ली: 500 आणि दोन हजारानंतर अखेर दोनशे रुपयांची नोटही बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. दोनशे रुपयांची नोट उद्या म्हणजेच शुक्रवारी बाजारात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने ही माहिती दिली.

केंद्र सरकारने दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची अधिसूचना नुकतीच जारी केली होती.

दरम्यान दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.



नऊ महिन्यात चलनात येणारी ही दुसरी नवी नोट असेल. यापूर्वी नोटाबंदीनंतर 8 नोव्हेंबर 2016 रोजी दोन हजाराची नोट आणण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यानंतर आज दोनशे रुपयांची नोट बाजारात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

100 रुपयानंतर थेट 500 आणि त्यानंतर थेट दोन हजाराची नोट, यामुळे या चलनात मोठी तफावत जाणवते. त्यामुळे दोनशे रुपयांची नोट आणली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

200 च्या नोटेची वैशिष्ट्ये

  • नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो

  • नोटेवर स्वच्छ भारतचा लोगो

  • नोटेचा आकार  66 mm × 146 mm

  • अंधाना नोट ओळखता येणार

  • नोटेवर हिरव्या रंगात ‘RBI’, ‘भारत’,‘India’ and ‘200’


50 रुपयांचीही नवी नोट

काहीच दिवसांपूर्वी आरबीआयने 50 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची घोषणा केली होती. पन्नास रुपयांची ही नवी नोट फ्लोरसंट निळ्या रंगाची असेल. सध्या चलनात असलेल्या पन्नासच्या नोटा यापुढेही चलनात राहतील.

संबंधित बातम्या

दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना


50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा 


 दोन हजार रुपयांची नोट लवकरच बंद? अरुण जेटलींचं उत्तर