दिल्ली विमानतळावर तिचे आगमन होताच ढोल-ताशाच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांनी तिच्याशी संवाद साधताना म्हणाली की, ''देशासाठी पदक मिळवण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. त्यासाठी गेल्या 12 वर्षांपासून कठोर परिश्रम घेतले. आज हे स्वप्न पूर्ण झाल्याने आनंद होतो आहे. देशातील सर्व जनतेने दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे. भविष्यातही मला असेच प्रोत्साहन द्यावे,'' अशी विनंतीही तिने यावेळी केली.
साक्षीच्या विजयाचा गौरव करण्यासाठी हरियाणातील रोहतकमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक मंत्र्यांसह जवळजवळ 30 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. साक्षीच्या गौरवासाठी केंद्र सराकारच्या वतीने तिला खेलरत्न आणि हरियाणा राज्य सरकारमार्फत अडीच कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
रिओ ऑलिम्पिकमधील 58 किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकने किर्गिस्तानच्या एसुलू ताइनीबेकोवा हिला 8-5 गुणांनी चीतपट करून कांस्यपदकाची कमाई केली होती. साक्षीने आपल्या कारकीर्दीतील हे तिसरे पदक जिंकले आहे.