अंगावर पाणी उडाल्याने वसईत चौघांवर प्राणघातक हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 06:17 PM (IST)
वसई : अंगावर पाण्याचे काही शिंतोडे उडाल्याचा राग येऊन वसईत चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी वालिव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत. वसई पूर्वेकडील नवजीवन शांती नगरमध्ये राहणारा अब्दुल बयान खान हा तरुण घरासमोर मोटारसायकल धूत होता. त्यावेळी तिथून जाणाऱ्या मासुम शहा उर्फ बाबाच्या अंगावर पाण्याचे काही शिंतोडे उडाले. त्याचा राग येऊन बाबानं साथीदारांच्या मदतीनं चौघांवर प्राणघातक हल्ला केला. अब्दुल बयान खान,अब्दुल माबुद खान, अब्दुल सुभर खान आणि अफजल हुसैन खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या मारहाणीत चारही जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर वसईतल्या बंगाली रुग्णालयात उपचार सुरु आहेत.