नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बुद्धिबळाचा बादशाह विश्वनाथन आनंद यांना केंद्रातील मोदी सरकारने खेळाशी संबंधित समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मोदी सरकारने दोन्ही दिग्गजांना डिसेंबर 2015 मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय क्रीडा परिषदेतून काढलं आहे. देशात खेळाच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी  केंद्र सरकारने या समिती स्थापन केली होती.


नवे सदस्य म्हणून क्रिकेटर हरभजन सिंह आणि के. श्रीकांत यांचा समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी डिसेंबर 2015 मध्ये याची स्थापना केली होती. डिसेंबर 2015 पासून मे 2019 पर्यंत समितीच्या पहिल्या कार्यकाळात सचिन तेंडुलकरचा राज्यसभा खासदार आणि विश्वनाथन आनंदचा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.


बैठकांना दांडी मारल्याने सचिन, आनंदला बाहेरचा रस्ता
आता समितीमध्ये सदस्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. समितीमध्ये आता 27 ऐवजी 18 सदस्य असतील. सचिन आणि आनंदशिवाय बॅडमिंटनचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद तसंच माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांनाही हटवण्यात आलं आहे. समितीच्या बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांना हटवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


गोपीचंदही समितीमधून बाहेर
पुलेला गोपीचंद यांना समितीमधून हटवण्यामागे त्यांची व्यस्त वेळापत्रक हे कारण असल्याचं म्हटलं जात आहे. गोपीचंद टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांचा समितीमध्ये समावेश केलेला नाही, असं सांगितलं जात आहे.


समितीमध्ये नव्या सदस्यांचा समावेश
क्रीडा प्रकरणांच्या या समितीमध्ये नवे सदस्य म्हणून तिरंदाज लिम्बा राम, धावपटू पी.टी उषा, बछेंद्री पाल, पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, नेमबाज अंजली भागवत, रेनेडी सिंह आणि पैलवान योगेश्वर दत्त यांचा समावेश करण्यात आला आहे.