मुंबई: क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिन आणि त्याच्या चाहत्यांसाठी-भक्तांसाठी हा दिवस खास आहे.

जगभरातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. केवळ क्रिकेटच नव्हे तर सर्व क्षेत्रातून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सध्या सचिन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा आयकॉन म्हणून काम पाहात आहे.

सचिन हा क्रिकेट इतिहासातील असा तारा आहे, ज्याच्या रेकॉर्डसमोर सर्व क्रिकेटर नतमस्तक होतात. कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये मिळून सचिनने शतकांचं शतक पूर्ण केलं आहे. 

सचिनबाबतच्या काही खास गोष्टी 

*सचिन हा  भारताचा पहिला आणि एकमेव असा क्रिकेट आहे, ज्याने आपल्या पहिल्या रणजी, दुलीप आणि इराणी ट्रॉफी सामन्यात शतक ठोकलं आहे.

* सचिन सुरुवातीला टेनिसचा खूप चाहता होता. त्यामुळे त्याचा कल टेनिसकडे होता. तो त्यावेळी टेनिसपटू जॉन मॅक्नरोचा जबरदस्त फॅन होता.

* वडील रमेश तेंडुलकर यांनी प्रसिद्ध संगीतकार सचिन देव यांच्या नावावरुन मास्टर-ब्लास्टरचं सचिन हे नाव ठेवलं.

* सचिनच्या पहिल्या रणजी सामन्यापूर्वी मुंबई संघाने स्वत:च्या संघातील खेळाडूंची एक सिरीज घेतली होती. त्यावेळी सचिनकडे हेल्मेट नव्हतं. समोर राजू कुलकर्णी नावाचा एक गोलंदाज वेगवान गोलंदाजी करत होता. एक छोटा मुलगा हेल्मेटशिवाय खेळतोय म्हणजे तो आपली थट्टा करतोय असं राजूला वाटलं. त्याने लगेच बॉन्सर टाकायला सुरुवात केली. त्यावेळी राजू कुलकर्णी हे रागात होते आणि सचिन देवाची प्रार्थना करत होता, हे सचिन आजही आठवतो.

* सचिनला गाड्यांची क्रेज आहे. सचिनने सर डॉन ब्रॅडमन यांच्या 29 व्या शतकाची बरोबरी केली, तेंव्हा वेगाचा बादशहा मायकल शुमाकरने सचिनला फेरारी 360 मोडिना गिफ्ट केली होती.

* सचिन 1995 मध्ये ‘रोजा’ हा सिनेमा पाहण्यासाठी वेष बदलून गेला होता. त्याला कोणी ओळखू नये म्हणून सचिनने ही युक्ती केली. मात्र त्याचा चष्मा खाली पडला तेव्हा त्याला सर्वांनी ओळखलंच.

* 1992 मध्ये सचिन क्रिकेट जगताचा एक मोठं नाव बनला होता. त्या वर्षी तो 4 महिन्यांच्या ऑस्ट्रेलियावर दौऱ्यावर गेला होता. त्यादरम्यान मुंबईत कॉलेज स्पर्धाही सुरू होणार होत्या. आपण किर्ती कॉलेजकडून खेळू असं सचिनने सांगितलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सचिनने कॉलेजकडून बॅटिंग केली आणि डाऊन टू अर्थ असल्याचं दाखवून दिलं.

* सचिन क्रिकेटविश्वात टॉपवर होता, तेव्हा सर्वात जड बॅट वापरणारा तो एकमेव खेळाडू होता. त्याच्या बॅटचं वजन साधारण दीड किलो होतं.

* क्रिकेटमध्ये आल्यानंतर सुरुवातीला सचिनला वेगवाग गोलंदाज बनायचं होतं. त्यासाठी तो चेन्नईतील एका फाऊंडेशनमध्ये गेला होता. मात्र कमी उंची असल्यामुळे मेंटर डेनिस लिली यांनी त्याला परत पाठवलं. तू बॅटिंग कर असं त्यावेळी त्याला सांगण्यात आलं. सचिननंतर सौरव गांगुली हा असा दुसरा खेळाडू होता, ज्याला परत पाठवण्यात आलं होतं.

*सचिन तेंडुलकरने एकदा पाकिस्तानकडून फिल्डिंग केली आहे. 1987 मध्ये मुंबईतील ब्रेब्रॉन स्टेडियमवर एक प्रॅक्टिस मॅच खेळवण्यात आली. त्यावेळी सचिन भारतीय संघात नव्हता. सचिन राखीव खेळाडूही नव्हता. मात्र त्याला पाकिस्तानचा सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून इम्रान खानच्या संघात पाठवण्यात आलं होतं. 

* वयाच्या 19 व्या वर्षी कौंटी क्रिकेट खेळणारा सचिन हा सर्वात कमी वयाचा खेळाडू होता.

* शतकांचं शतक झळकावणाऱ्या सचिनला, वन डे सामन्यांतील पहिलं शतक झळकावण्यासाठी तब्बल 79 सामने खेळावे लागले.

* टीव्ही अंपायरप्रणाली वापरण्यात आली तेव्हा त्या अंपायरद्वारे रन आऊट देण्यात आलेला सचिन हा पहिला खेळाडू होता. डर्बन कसोटीत आफ्रिकेचा खेळाडू जॉन्टी रोड्सच्या थ्रोवर सचिन धावबाद झाला होता.

*  जाहिरात क्षेत्रात सचिन पहिल्यांदा कपिल देवसोबत बूस्टच्या जाहिरातीत दिसला होता.

* सचिनला आऊट करण्यासाठी जगभरातील गोलंदाज अक्षरश: झुंजत होते. इंग्लंडचा गोलंदाज अॅलन मुलालीही त्यातलाच एक. मात्र सचिने नियम डावलून जड बॅट वापरत असल्याचा आरोप मुलालीने केला होता. मात्र हा आरोप फेटाळण्यात आला.

* 1996 पर्यंत सचिनच्या बॅटवर कोणत्याही स्पॉन्सर्सचं नाव नव्हतं. मात्र त्यानंतर त्याच्याकडे स्पॉन्सर्सच्या रांगा लागल्या.
* सचिन जेव्हा बॅटिंगचं प्रॅक्टिस करत होता, तेव्हा तो मित्रांना टेनिस बॉल भिजवून  गोलंदाजी करायला लावत होता. त्यामुळे बॉल नेमका बॅटवर कुठे लागला हे तो पाहू शकत होता.

* सचिन असा एकमेव खेळाडू आहे ज्याने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कार पटकावला आहे.
* सचिन यॉर्कशायर संघाकडून कौंटी क्रिकेट खेळला आहे. अशा स्पर्धांमध्ये खेळणारा तो पहिला परदेशी खेळाडू आहे.
* सचिन क्रिकेटच्या मैदानावर असायचा, तेव्हा त्याबाबतचे अंधश्रद्धेचे अनेक किस्से सर्वांना माहीत आहेत. मात्र सचिन ज्या-ज्या वेळी मैदानात असायचा, तेव्हा पत्नी अंजली उपवास करत होती.
*  सचिनला घड्याळ आणि पर्फ्युम्स जमवण्याचा छंद आहे.
* सचिन जेव्हा पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा जे पॅड त्याने पायाला बांधलं होतं, ते सुनील गावसकर यांनी त्याला गिफ्ट केलं होतं.

* सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणारा सचिन पहिला खेळाडू आहे.

* 1989 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला सचिन, पहिल्यांदा यष्टीचित म्हणजेच स्टम्पिंगवर बाद झाला तो 2002 मध्ये. त्यावेळी तो शतकाच्या जवळ होता.
* सचिनने वयाची 20 वर्ष पूर्ण करण्यापूर्वी पाच शतकं ठोकली होती. हा रेकॉर्ड अजूनही सुरक्षित आहे.

* सचिन तेंडुलकर जगभरातील 90 स्टेडियमवर खेळला आहे. तोही एक रेकॉर्ड आहे.

* सचिन आणि सौरव गांगुलीच्या नावे सलामीला येऊन सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम 2014 पर्यंत कायम होता. या जोडीने 128 सामन्यात तब्बल 6271 धावा केल्या आहेत.

* एका वर्षात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावे आहे. सचिनने 1998 मध्ये 9 वन डे शतकं झळकावली आहेत. या वर्षीत सचिनने 1894 धावा केल्या होत्या.

* सचिन 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका रिअॅलिटी शोमध्येही उपस्थित होता.
* क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सचिनने एकही शतक झळकावलेलं नाही. मात्र राणी डायना यांच्यासाठी भरवण्यात आलेल्या एका सामन्यात सचिनने शतक ठोकून, हे स्वप्नही पूर्ण केलं.

* सचिन ‘अपनालय’ या एनजीओमार्फत दरवर्षी 200 मुलांना स्पॉन्सर करतो.