कोलकाता : गौतम गंभीरच्या कोलकात्यानं विराट कोहलीच्या बंगळुरुचा अवघ्या 49 धावांत खुर्दा उडवून, आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला सर्वात सनसनाटी विजय साजरा केला. कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 82 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुची 49 ही धावसंख्या आयपीएलच्या इतिहासातला आजवरचा नीचांक ठरला.
विराट, गेल, डिव्हिलियर्स आणि केदार जाधव यांच्यासारखे चार आंतरराष्ट्रीय फलंदाज असूनही अख्खा डाव दहा षटकांच्या आत केवळ 49 धावांत आटोपणं ही बंगळुरुसाठी मोठी नामुष्की ठरावी. बंगळुरुच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावा करता आल्या नाहीत. केदार जाधवच्या नऊ धावा ही बंगळुरुच्या डावातली सर्वोत्तम कामगिरी ठरली.
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. मनदीप सिंग, एबी डिव्हिलियर्सही स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ख्रिस गेलही सात धावांवर माघारी परतला.
खरं तर बंगळुरुच्या गोलंदाजांनी ईडन गार्डन्सवरच्या आयपीएल सामन्यात बंगलोरच्या गोलंदाजांनीही कोलकात्याला 131 धावांत गुंडाळून कौतुकास्पद कामगिरी बजावली होती. पण कोलकात्याच्या कूल्टर-नाईल, ख्रिस वोक्स आणि कॉलिन डी ग्रॅण्डहोमनं तीन-तीन फलंदाजांना माघारी धाडून बंगलोरला चारीमुंड्या चीत केलं.
त्याआधी सामन्यात बंगळुरुच्या तीन फिरकी गोलंदाजांनी मिळून कोलकात्याच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलनं 16 धावांत तीन, डावखुरा स्पिनर पवन नेगीनं 15 धावांत दोन, तर लेग स्पिनर सॅम्युअल बद्रीनं 33 धावांत एक विकेट घेतली.