उस्मानाबाद : ''महाराष्ट्रातील पंधरा गावात जाऊन आपल्या पथकातील सदस्यांनी पाहणी केली. वेगवेगळ्या धर्माचे लोक मोठ्या संख्येने आनंदाने एकत्रित राहत आहेत, ही बाब खूप भावली. या धार्मिक एकोप्यामुळेच आपण डोंजा या गावाची आदर्श संसद ग्राम योजनेत निवड केली'', असं भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी जाहीर केलं.


उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील डोंजा हे गाव दोन वर्षांपूर्वी खासदार तेंडुकर यांनी दत्तक घेतलं होतं. त्यानंतर गावात तेंडुलकर यांच्या खासदार निधीतून विविध विकास कामांना सुरुवात करण्यात आली. गाव दत्तक घेतल्यानंतर सचिन पहिल्यांदाच डोंजावासीयांच्या भेटीसाठी मंगळवारी येथे आला होता. यावेळी त्याने गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

... म्हणून डोंजा गावाची निवड - सचिन

''गाव दत्तक घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील पंधरा गावांना आपल्या पथकातील सदस्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यात डोंजा गावाचा अहवाल आपणास सर्वाधिक समाधानकारक वाटला.'' चांगला विचार करणाऱ्या लोकांमध्येच चांगुलपणा असतो आणि येथील धार्मिक एकोपा हे त्याचंच द्योतक असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.

''लहानपण आणि शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. माझ्याही आयुष्यात शाळा आणि लहानपण याचं महत्व मोठं आहे. याच काळात आपण देशासाठी क्रिकेट खेळण्याचं आणि वर्ल्ड कप भारतासाठी जिंकून द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. लहानपणी आवर्जून स्वप्न पहा आणि ती सत्यात यावीत, यासाठी मोठ्या प्रामाणिक प्रयत्नांनी त्याचा पाठपुरावा करायला हवा.'' असा अनमोल संदेशही सचिनने उपस्थित विद्यार्थ्याना दिला.

''सुरुवातीला डोंजा गावात काम करायला अडचण आली, मात्र नंतर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या सहकार्यामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या. एकट्या बॅट्समनच्या जोरावर सामना जिंकता येत नाही, समोरील जोडीदारही तसाच असायला हवा. जिल्हा प्रशासन आणि ग्रामस्थ दोन्ही तगडे जोडीदार आपल्या सोबत असल्यामुळे या कामाला पुढील काळात निश्चित चांगला आकार येईल'', अशी अपेक्षाही सचिनने व्यक्त केली.

''आपण स्वच्छ भारत योजनेचे राजदूत आहोत. आपले घर म्हणजे ही धरती असे मानून आपण स्वछता राखायला हवी. आपल्या गावात आल्यावर स्वच्छतेची जाणीव झाली, मात्र याहून अधिक स्वच्छता आपणास राबवावी लागेल असे सांगून ग्रामस्थांच्या सहवासातील या आठवणी आणि येथील आदर आतिथ्य आपल्या कायम स्मरणात राहील,'' असंही सचिनने नमूद केलं.

प्रशासनाला सत्कार उरकण्याची घाई

साक्षात क्रिकेटचा देव आपल्याला आयता पाहुणा लाभल्याने प्रशासनाने सणात सत्यनारायण उरकण्याचा प्रयत्न केला. लोकराज्य मासिकाचा प्रचार, बळीराजा चेतना अभियानातील प्रमाणपत्राचं वाटप, प्रौढ साक्षरांचा सत्कार अशा विविध सत्कारांची जंत्री समोर आल्यावर सचिनचे समन्वयक सुनंदन लेले यांनी चक्क व्यासपीठावरून नाराजी व्यक्त केली. प्रशासनाला सत्कार उरकण्याची घाई आणि सचिनला वेळ नाही, असं चित्र पाहायला मिळालं.

रांगोळी आणि गुढ्या उभारून स्वागत

पहिल्यांदाच गावात आलेल्या आंतराष्ट्रीय ख्यातीच्या सचिन तेंडुलकर या पालकाचं स्वागत करण्यासाठी अवघं डोंजा गाव सजलं होतं. चौकाचौकात रांगोळीचे गालिचे, दारांवर आंब्याच्या पानांची तोरणे, घरावर उभारलेल्या गुढ्या आणि आमची शान भारतरत्न अशा फलकांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या स्वागत कमानी जणू डोंज्यात दिवाळी अवतरली होती.

डोंजा येथे मागील दोन दिवसांपासून भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांच्या स्वागतासाठी ग्रामास्थानी तयारी केली होती. ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास सचिन तेंडुलकरचं चॉपरने आगमन झालं. सकाळपासून शांततेत स्वागताची सुरू असलेल्या तयारीला प्रशासनाच्या बेशिस्तीमुळे गालबोट लागले आणि क्रिकेटच्या मैदानात तडाखेबंद फलंदाजी करणाऱ्या सचिनलाही या गडबड गोंधळचा सामना करावा लागला.

शाळेतील मुलांसोबत सचिन क्रिकेट खेळणार होता. त्यासाठी डोंजा विद्यालयाच्या मैदानात सर्व तयारी करण्यात आली होती. शाळेतल्या लहान विद्यार्थिनी टिपऱ्यांच्या तालावर स्वागतासाठी सकाळपासून सजून बसल्या होत्या. ठरल्या वेळेनुसार सचिन शाळेत आला. विद्यार्थ्यांशी बोलला आणि क्रिकेटच्या मैदानावर उतरताच गोंधळाला सुरुवात झाली.

मैदानात उतरलेल्या सचिनसोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक कर्मचारी आणि अधिकारीच उतावीळ झाले होते. मैदानात उतरलेल्या सचिनची सकाळपासून वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांना त्यामुळे दर्शन झालं नाही. त्यामुळे गोंधळात वाढ झाली. सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लाकडी बॅरीकेड्स तोडून ग्रामस्थाही मैदानात उतरले.

सचिनसोबत क्रिकेट खेळण्याची स्वप्न पाहणाऱ्या डोंजा येथील विद्यार्थ्यांच्या आनंदावर मात्र त्यामुळे पाणी फेरलं गेलं. अचानक वाढलेला गोंधळ पाहून हातात नुकतीच बॅट उचललेल्या सचिनने देखील मैदानात काढता पाय घेत पुढील कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रस्थान केलं. सलग तीन तासांपासून सचिनच्या स्वागतासाठी हातात टिपऱ्या घेऊन सजून बसलेल्या शाळकरी विद्यार्थिनींचा पडलेला चेहरा मात्र प्रशासनाला वाचता आला नाही.

डोंजा विद्यालयात तेंडुलकर दाखल झाल्यानंतर गर्दीतून वाट काढत जिल्हाधिकारी शाळेच्या कार्यालयाजवळ पोहचले. अचानक वाढलेल्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी सुरक्षाकडं तयार करण्यात आलं. त्यात जिल्हाधिकारीच अडकून पडले. शेवटी त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकाने वाट काढून दिल्यामुळे जिल्हाधिकारी सचिन तेंडुलकरपर्यंत पोहचले.

सांगूनही रस्ता दुरुस्त केला नाही

सचिनचं हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी उतरलं, त्या हेलिपॅडपासून कार्यक्रमाचं ठिकाण सुमारे दीड किलोमीटर अंतरावर होतं. या रस्त्यावरील एका पुलावर गावकऱ्यांनी फुलांच्या पाकळ्या अंथरून त्याचं स्वागत केलं. बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेला रस्ता सचिन येण्यापूर्वी दुरुस्त करावा, अश्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांनी देऊनही त्याची डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यावर तेंडुकरांच्या पथकातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सरपंच पती सूर्यवंशी यांनी दिली.