पणजी : ‘ड्रग्सचं सेवन करुन रात्रभर डान्स करता येतो. पण दारु पिऊन करणं अशक्य असल्याचं,’ विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं. गोवा विधानसभेच्या अधिवेशनात काँग्रेस आमदार प्रताप सिंह राणे यांनी लक्षवेधीद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पर्रिकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.


ते म्हणाले की, “ड्रग्सचं सेवन केल्याशिवाय तुम्ही रात्रभर डान्स करु शकत नाही. पण दारु पिल्यानंतर फक्त दोन ते तीन तासच डान्स करता येतो.”

काँग्रेस आमदार प्रताप सिंह राणेंनी गोव्यातील ड्रग्स माफियांना कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना, पर्रिकरांनी गोव्यातील रेव्ह पार्ट्यांवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. तसेच आमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं, त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पर्रिकरांनी सांगितलं की, “गोवा पोलिसांनी राज्यातील अशा काही पर्यटन स्थळांची ओळख पटवली आहे. जिथे ड्रग्सचा सर्रास व्यापार होतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांना काळ्या यादीत टाकलं जाईल. तसेच रेव्ह पार्ट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, प्रशसनाने मोहीम सुरु केली आहे.”

दरम्यान, गोव्याची ओळख एक जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आहे. दरवर्षी इथे लाखो देशी आणि परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे आमली पदार्थांच्या तस्करांवर रडारवर हे नेहमीच राज्य राहिलं आहे.