रशियाकडून इजिप्तचा 3-1 असा पराभव. त्याआधी, रशियानं उडवला सौदी अरेबियाचा 5-0 असा धुव्वा.
ही आहे यजमान रशियाची फिफा विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमधली कामगिरी. या कामगिरीसह रशियानं विश्वचषकाच्या बाद फेरीचं तिकीटही बुक केलं आहे. यंदाच्या फिफा विश्वचषकात रशियन क्रांती पाहायला मिळणार का, असा प्रश्न फुटबॉलच्या जाणकारांना पडला आहे.
रशियाच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात खरोखरच मोठ्या झोकात झाली, पण विश्वचषकाआधी ही परिस्थिती नव्हती. विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित सात सामन्यांमध्ये रशियाला एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळं रशियाच्या पाठीराख्यांमध्ये आपल्या संघाच्या कामगिरीविषयी फारसा उत्साह नव्हता. पण रशियन संघानं लागोपाठ दोन विजय मिळवून, १९८६ सालानंतर पहिल्यांदाच विश्वचषकाची बाद फेरी गाठली आणि त्यांच्या देशातलं सारं चित्रच पालटलं.
रशियातला फिफा विश्वचषकासाठीचा उत्साह कितीतरी पटीनं उंचावला आहे. यजमानांची पहिल्या दोन सामन्यांधली कामगिरी हेच त्याचं कारण आहे.
रशियाची फिफा विश्वचषकात खेळण्याची ही अकरावी वेळ आहे. पण आजवरच्या इतिहासात रशियाला विजेतेपद पटकावायचं दूर, पण अंतिम फेरीही गाठता आलेली नव्हती. 1966 सालच्या विश्वचषकात रशियानं उपांत्य फेरीत धडक मारली होती. तीच रशियाची विश्वचषकातली आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदाच्या विश्वचषकात पहिल्या दोन्ही सामन्यात जबरदस्त कामगिरी बजावून, रशियानं तो इतिहास बदलण्याचा जणू चंग बांधला आहे.
रशियाचा २०१८ सालच्या विश्वचषकाचा संघ हा आजवरचा त्यांचा सर्वोत्तम संघ समजला जातोय. डेनिस चेरिशेव्ह, युरी गझिन्स्की, अलेक्झांडर गोलोविन, आर्टेम झ्युबा या शिलेदारांची आतापर्यंतची कामगिरी प्रभावी ठरली आहे. 27 वर्षांच्या डेनिस चेरिशेव्हनं दोन सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक तीन गोल झळकावले आहेत. आर्टेम झ्युबानंही दोन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकी एक गोल नोंदवून, लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. त्याशिवाय युरी गझिन्स्की आणि अलेक्झांडर गोलविनच्या खात्यातही एकेका गोलची नोंद झाली आहे. पण ही रशियाची सर्वोत्तम कामगिरी नाही, तर रशियाची सर्वोत्तम कामगिरी आपल्याला अजून पाहायला मिळायची असल्याचा दावा प्रशिक्षक स्टॅनिस्लाव चेर्चेसोव्ह यांनी केला आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या रशियात यंदा पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं मायदेशातल्या विश्वचषकात रशिया आणखी किती सर्वोत्तम कामगिरी बजावतो, याविषयी जाणकारांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. पण यजमानांचं म्हणाल, तर फुटबॉलच्या इतिहासात यजमानांनी आजवर सहावेळा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यात 1930 साली उरुग्वे, 1934 साली इटली, 1966 साली इंग्लंड, 1974 साली जर्मनी, तर 1978 साली अर्जेंटिनानं यजमान असताना फिफा विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला होता. यंदा रशियाचा संघ त्यांच्या पंक्तीत बसतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.