नागपूर : समुद्र किनारपट्टी नसतानाही विदर्भात सध्या एका मोठ्या जहाजाची निर्मिती होत आहे. जुलै महिन्यात विदर्भवासीय तब्बल 80 टन पोलादाचा वापर करुन तयार झालेले हे जहाज प्रत्यक्ष पाण्यात तरंगतानाही पाहणार आहेत.


नागपूर जिल्ह्यातील कोराडीमध्ये सध्या हे जहाज बांधले जात असून, त्याचे 60 टक्के काम पूर्णही झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात असलेल्या कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या शेजारी असलेल्या कोराडी तलावात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गाळ साचले आहे. तसेच 192 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या तलावाला बहुतांशी ठिकाणी टाईफा नावाच्या गवताने वेढले आहे. त्यामुळे तलावाची जलग्रहण क्षमता खूप कमी झाली आहे.

कोराडी तलावाचे क्षेत्रफळ आणि खोली जास्त असल्याने सामान्य पद्धतीने जेसीबी आणि पोकलॅन्ड मशीनचा वापर करुन गाळ काढणे जिकिरीचे होत होते. त्यामुळे महानिर्मितीने तलावाच्या आतील भागातील गवत आणि तलावाच्या तळात साचलेला गाळ काढण्यासाठी विशेष योजना आखली आहे.

सध्या तलावाच्या काठावर कोस्टल ड्रेजिंग एन्ड आर बी इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीमार्फत लोह पोलादाचा 80 टनाचा महाकाय जहाज निर्माण केला जात आहे. लवकरच त्यावर एक जेसीबी, पोकलॅन्ड आणि इतर काही मशीन स्थापित करुन जुलै महिन्यात हे जहाज तलावात उतरविले जाईल आणि त्याच्या माध्यमातून 192 हेक्टर क्षेत्रात वाढलेले गवत काढले जाईल. त्यानंतर कटर सक्शन ड्रेजर या तंत्राचा वापर करुन तलावाच्या तळात 3 ते 5 मीटरपर्यंत खोदकाम करुन लाखो टन गाळ काढले जाईल.

सागर विज्ञानात खोदकामासाठीच्या यंत्राला घेऊन पाण्यात उतरवल्या जाणाऱ्या अशा जहाजाला स्पड पंटून शिप असे म्हणतात. साधारणपणे स्पड पंटून शिपचे कार्य सागरी किनाऱ्यावर किंवा खाडीच्या प्रदेशात पाहायला मिळते. मात्र आता थेट विदर्भभूमीवर हे स्पड पंटून शिप पाहायला मिळणार असल्याने लोकांची उत्सुकता वाढीला आहे.