जयपूर : किंग्स इलेव्हन पंजाबनं राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव करुन आयपीएलच्या बाराव्या मोसमाची विजयी सुरुवात केली. या सामन्यात पंजाबनं राजस्थान विजयासाठी 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थाननं दोन बाद 148 अशी मजल मारली होती. पण राजस्थानच्या फलंदाजांनी ऐन मोक्याच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे राजस्थानला नऊ बाद 170 धावांचीच मजल मारता आली.


राजस्थानकडून जोस बटलरनं 43 चेंडूत सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने 30, कर्णदार अजिंक्य रहाणेनं 27 आणि स्टीव्हन स्मिथने 20 धावांची खेळी केली. मात्र राजस्थानच्या खालच्या फळीतील खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे राजस्थानचा पराभव झाला. पंजाबच्या सॅम करन, मुजीब रेहमान आणि अंकित राजपूतनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.


त्याआधी ख्रिस गेलच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं 20 षटकांत चार बाद 184 धावांची मजल मारली होती. गेलनं या सामन्यात 47 चेंडूत आठ चौकार आणि चार षटकारांसह 79 धावांची खेळी केली. त्याने या खेळीसह आयपीएलमध्ये 4 हजार धावाही पूर्ण केल्या. गेलनंतर आलेल्या सर्फराज खाननंही 29 चेंडूत नाबाद 46 धावा फटकावल्या, तर मयंक अगरवालने 22 धावांची खेळी केली. राजस्थानकडून बेन स्टोक्सने दोन, धवल कुलकर्णी आणि कृष्णप्पा गोथनने प्रत्येकी एक विकेट घेतली.