सोलापूर : आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे आणि वाद ओढावून घेणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांचा उल्लेख दानवेंनी अतिरेकी म्हणून केला आहे.


पाकिस्ताननं आपल्या देशातले 40 अतिरेकी मारल्यानं देशात प्रचंड रोष निर्माण झाला, असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी सोलापूरमधील भाषणात केलं आहे. स्लिप ऑफ टंग झालेल्या दानवेंची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दानवेंवर या वक्तव्यामुळे मोठी टीका होण्याची शक्यता आहे.



याआधी शेतकऱ्यांचा 'साले' म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र तरीही दानवे आणि त्यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत राहतात.


बनावट व्हिडीओद्वारे बदनामी करण्याच डाव 


भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बनावट व्हिडीओ क्लिप तयार करुन बदनामी  केली जात आहे. एका राजकीय पक्षाने ही गैरसमज पसरवणारी ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले याचा व्हिडीओ आमच्याकडे असल्याचंही भाजपने म्हटलं आहे.



आगामी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे जालन्यातून निवडणूक लढणार आहेत. मात्र जालन्यातून उमेदवारी मिळवतानाही दानवेंची मोठी दमछाक झाली होती. दानवेंच्या उमेदवारीच्या आड शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आले होते. अर्जुन खोतकर हे देखील जालन्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेतल्याने रावसाहेब दानवेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.