मुंबई : आशिया चषकातील धमाकेदार प्रदर्शनानंतर भारताचा सलामीवीर स्फोटक फलंदाज रोहित शर्मा वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली नव्हती. त्यामुळे एकदिवसीय मालिकेसाठी रोहित उत्सुक दिसत आहे.


या मालिकेत रोहित शर्माला माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे असलेला विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे. फलंदाजी करताना लांब-लांब षटकार मारणारा रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांना याबाबतीत मागे टाकू शकतो.


भारताकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने 463 सामन्यांत 195 षटकार लगावले आहेत. तर माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सौरवने 311 सामन्यात 190 षटकार लगावले आहेत.


रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने केवळ 188 एकदिवसीय सामन्यांमध्ये 186 षटकार ठोकले आहेत. रोहितला सचिनच्या या विक्रमाच्या पुढे जाण्यासाठी अवघ्या 9 षटकारांची आवश्यकता आहेत. त्यामुळे वेस्ट इंडियाविरुद्धच्या मालिकेत रोहित हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.