शिर्डी : शिर्डीत पार पडलेल्या शताब्दी समाधीच्या पुण्यतिथी उत्सवादरम्यान आलेल्या साईभक्तांनी बाबांना भरभरुन दान दिलं आहे. उत्सव काळात आलेल्या साई भक्तांकडून चार दिवसात साईंच्या झोळीत तब्बल 5 कोटी 97 लाखांच विक्रमी दान प्राप्त झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सव्वा कोटीनं जास्त दान प्राप्त झालं आहे.


विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी साईबाबांचा पुण्यतीथी उत्सव साजरा करण्यात येतो. तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी समाधी शताब्दी वर्ष असल्यानं तीन लाखाहून अधिक भाविकांनी साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. 16 ते 19 ऑक्टोबरदरम्यान लाखो भाविकांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं.


या चार दिवसात आलेल्या दानाची आज मोजदाद करण्यात आली आहे. त्यानुसार भाविकांनी दानपेटीत 2 कोटी 52 लाख रुपये, ऑनलाईन पद्धतीने 1 कोटी 41 लाख रुपये, देणगी काऊंटरवर 1 कोटी 46 लाख रूपये दान दिलं. तर दानपेटीत सुमारे 28 लाखांचे सोने आणि चांदीही भाविकांनी अर्पण केली. याशिवाय भिक्षा झोळीत साडेतीन लाख रुपये, 21 देशांचे 25 लाख रुपयांचे परकीय चलनही दानपेटीत मिळाले आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत दानात 1 कोटी 26 लाख रुपयांची वाढ झाली, तर एकूण 5 कोटी 97 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाल्याची माहिती संस्थानच्या वतीनं देण्यात आली.


या दानाव्यतिरिक्त साईभक्तांना दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी पेड दर्शनाच्या माध्यमातूनही 78 लाख रूपये तर लाडू विक्रीतून 28 लाख रूपये साई संस्थानला मिळाले आहेत. यावर्षी साई समाधीला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं विशेष महत्व होतं. शताब्दी समाधी वर्षात देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक दिग्गजांनी साई दरबारी हजेरी लावत साईंचे दर्शन घेतलं.