Ravichandran Ashwin : अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गाबा कसोटीनंतर लगेचच अश्विनने कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत येऊन ही घोषणा केली. कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रविचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर केली आणि सांगितले की, भारतासाठी क्रिकेटपटू म्हणून हा शेवटचा दिवस होता. अश्विन आयपीएलसह क्लब क्रिकेट खेळत राहणार आहे. तो आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्यासाठी परतणार आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी सामना थांबला तेव्हा टीम इंडियाचे सदस्य ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होते, त्यादरम्यान रविचंद्रन अश्विनने विराट कोहलीला मिठी मारली. यावेळी त्याचे अश्रू अनावर झाले.


T20 वर्ल्डकपमध्ये अश्विनने विजय मिळवून दिला! 


अश्विन गोलंदाज म्हणून जितका प्रतिभाशाली होता, तितकाच फलंदाजीमध्येही तो चमकला. त्याने कसोटीत 6 शतके ठोकत आपली प्रतिभा दाखवून दिली. मात्र, टी-20 मध्येही अश्विनने चमक दाखवून दिली आहे. T-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला होता. सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंवर भारताला विजयासाठी 2 धावांची गरज होती. 20व्या षटकातील 5व्या चेंडूवर दिनेश कार्तिक यष्टीचीत झाला. यानंतर रविचंद्रन अश्विन क्रिजवर आला. भारताला आता एका चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती, पण पाकचा गोलंदाज मोहम्मद नवाजने चेंडू लेगस्टंपच्या बाहेर टाकला आणि अश्विनने तो सोडला कारण तो वाईड होता. 






चेंडू वळला असता तर?


मोहम्मद नवाजचा तो चेंडू वळला असता तर तो रविचंद्रन अश्विनच्या पॅडला लागला असता. अशा स्थितीत भारताला सामनाही गमवावा लागला असता. अश्विनच्या म्हणण्यानुसार, जर असे झाले असते तर तो निवृत्त झाला असता, 'जर नवाजचा तो चेंडू वळला असता आणि माझ्या पॅडला लागला असता तर मी एवढेच केले असते. ड्रेसिंग रूममध्ये येतो. माझे ट्विटर उघडले असते आणि ट्विट केले असते, खूप खूप धन्यवाद, माझी क्रिकेट कारकीर्द खूप छान होती. असे बोलून अश्विन हसला होता. यावरून अश्विनची प्रतिभा येते.


शेवटच्या चेंडूवर टीम इंडिया जिंकली


मोहम्मद नवाजने बॉल वाइड टाकला तेव्हा भारताला विजयासाठी एका चेंडूवर एक धाव हवी होती. यावेळी त्याने लेग स्टंपवर ओव्हर पिच बॉल टाकला. याच अश्वीनने मिडऑपवर खेळून एक धाव काढून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. 


चॅम्पियन्स ट्राॅफीमध्येही अश्विनच्या गोलंदाजीवर विजय 


तत्पूर्वी, 2013 मध्येही अश्विनने चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकून दिली होती. भारत विरुद्ध इंग्लंड फायनल रंगली होती. टीम  इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 129 धावा केल्या होत्या. इंग्लंडला शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. तेव्हा शेवटचे षटक टाकण्यासाठी धोनीने अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. यावेळी अश्विवने शेवटच्या षटकात 9 धावा देत विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना अश्विनने शेवटच्या चेंडूवर पाॅझ घेत चकवा दिला आणि चेंडू निर्धाव टाकला. तो क्षण आजही अभिमानाने आठवला जातो. 






दरम्यान, अश्विनने पत्रकार परिषदेत कोणताही प्रश्न विचारण्यास नकार दिला आणि घोषणा करून निघून गेला. ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूची कसोटी खेळताना अश्विनने एक विकेट घेतली होती. ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अश्विन म्हणाला, 'मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. भारतीय संघाचा क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे. अश्विनच्या बाहेर पडल्यानंतर रोहित म्हणाला, 'त्याला त्याच्या निर्णयावर खूप विश्वास आहे. आपण त्याच्या इच्छेचा आदर केला पाहिजे.' निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी तो ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीसोबत भावूक होताना दिसला.  


इतर महत्वाच्या बातम्या