Ind vs Aus 3rd Test Brisbane Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटी अनिर्णित राहिली आहे. पाचव्या दिवशी पावसामुळे जास्त खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये जोरदार पाऊस झाला आणि खराब हवामानामुळे सामना अनिर्णित राहिला. सध्या कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आता पुढील सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.






पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 445 धावा केल्या होत्या. यादरम्यान, स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी शतके झळकावली होती. हेडने 152 धावांची शानदार खेळी केली होती. तर स्मिथने 101 धावा केल्या होत्या. ॲलेक्स कॅरीने 70 धावांची खेळी खेळली. या काळात जसप्रीत बुमराहने भारताकडून 6 विकेट घेतल्या होत्या. तर मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. आकाश दीप आणि नितीश रेड्डी यांनी 1-1 विकेट घेतली.






केएल राहुल आणि रवींद्र जडेजाची दमदार कामगिरी -


भारताने पहिल्या डावात सर्वबाद 260 धावा केल्या होत्या. यादरम्यान सलामीवीर केएल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने 139 चेंडूंचा सामना करत 89 धावा केल्या. त्याने 8 चौकार मारले. रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावले. त्याने 123 चेंडूंचा सामना करत 77 धावा केल्या. जडेजाच्या या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. आकाश दीपने अखेरीस 31 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला.


ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी घातला धुमाकूळ -


ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने 89 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याने डाव घोषित केला. ॲलेक्स कॅरीने नाबाद 20 धावा केल्या होत्या. कमिन्सने 22 धावांची खेळी खेळली. भारताकडून गोलंदाजी करताना बुमराहने 3 बळी घेतले. सिराज आणि आकाश दीपने 2-2 बळी घेतले.


हे ही वाचा -


Ind vs Aus 3rd Test : टीम इंडियाचा पलटवार... पुन्हा गाबाच्या किल्लाला लावणार सुरुंग? जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान