मुंबई : मुंबईनं बडोद्याचा 309 धावांनी धुव्वा उडवून यंदाच्या रणजी मोसमाची धडाक्यात सुरुवात केली. या सामन्यात मुंबईनं बडोद्यासमोर 534 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण शम्स मुलानीच्या प्रभावी फिरकीसमोर बडोद्याचा दुसरा डाव 224 धावांत आटोपला. शम्सनं दुसऱ्या डावात सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानं या सामन्यात एकूण दहा विकेट्स घेऊन सामनावीराचा मानही मिळावला. शम्ससह शशांक अत्तरदे आणि आकाश पारकरनं प्रत्येक दोन विकेट घेत मुंबईच्या विजयात हातभार लावला. मुंबईनं या विजयासह सहा गुणांची कमाई केली.

पृथ्वी शॉ, गणेश सतीशचं द्विशतक


मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि विदर्भाच्या गणेश सतीशनं यंदाच्या पहिल्याच रणजी सामन्यात खणखणीत द्विशतकं झळकावलं. पृथ्वी शॉनं बडोद्याविरुद्ध  179 चेंडूत 17 चौकार आणि पाच षटकारांसह 202 धावा फटकावल्या. पृथ्वीचं प्रथम श्रेणी कारकीर्दीतलं हे पहिलच द्विशतक ठरलं. तर गणेश सतीशनं आंध्रविरुद्ध 25 चौकार आणि 5 षटकारांसह 237 धावा केल्या.

 

विदर्भाची विजयाची संधी हुकली

रिकी भुई आणि के एस भरतच्या नाबाद शतकांमुळे आंध्र आणि विदर्भ संघांमधला रणजी सामना अनिर्णित अवस्थेत संपला. पण पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर विदर्भानं तीन गुणांची कमाई केली. या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात 230 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे चौथ्या दिवशी विदर्भाला विजयाची संधी निर्माण झाली होती. पण आंध्रच्या रिकी भुईनं नाबाद 100 आणि भरतनं 102 धावांची खेळी करुन विदर्भाची विजयाची संधी हिरावली.

महाराष्ट्राची पराभवानं सुरुवात

नौशाद शेखच्या महाराष्ट्र संघाला रणजी कंरडकाच्या सलामीलाच दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. हरयाणानं महाराष्ट्राचा एक डाव आणि 68 धावांनी पराभव केला. या सामन्यात हरयाणानं 401 धावांचा डोंगर उभारुन महाराष्ट्राचा पहिल्या डाव 247 तर दुसरा डाव अवघ्या 86 धावांत गुंडाळला. हर्षल पटेलच्या प्रभावी माऱ्यासमोर महाराष्ट्राच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. हर्षल पटेलनं दुसऱ्या डावात महाराष्ट्राचे पाच मोहरे टिपले.