Ranji Trophy 2022 Semi-Finals, Mumbai vs Uttar Pradesh : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि उत्तर प्रदेश संघामध्ये दुसरा उपांत्य सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबईने मोठी आघाडी घेत विजयाकडे कूच केली आहे. उत्तर प्रदेशची परिस्थिती खराब आहे. कर्नाटकचा पराभव करत उपांत्य फेरीत पोहचलला उत्तर प्रदेशचा संघ पहिल्या डावात 180 धावाच करु शकला. मुंबईने पहिल्या डावात 193 धावा चोपल्या होत्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा संघ 180 धावांत संपुष्टात आला. परिणामी पहिल्या डावात मुंबईने तब्बल 213 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात मुंबईने दणक्यात सुरुवात केली. कर्णधार पृथ्वी शॉच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात एक बाद 133 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाअखेर मुंबईकडे तब्बल 346 धावांचा आघाडी आहे. 


मुंबईचा पहिला डाव - 
उत्तर प्रदेशचा कर्णधार करण शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक तोमर (113), यशस्वी जायस्वाल (100) यांची शतके. त्याचबरोबर शॅम्स मुलानी (50) याच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या. उत्तर प्रदेशकडून कर्णधार करण शर्माने चार विकेट घेतल्या. तर सौरभ कुमारने दोन आणि यश दयाल याने दोन विकेट घेतल्या. 
 
उत्तर प्रदेशचा पहिला डाव - 
393 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशची सुरुवात निराशाजनक झाली. उत्तर प्रदेशने ठरावीक अंतराने विकेट गमावल्या. मुंबईच्या गोलंदाजीपुढे उत्तर प्रदेशच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. उत्तर प्रदेशचा संपूर्ण डाव अवघ्या 180 धावांत संपुष्टात आला. उत्तर प्रदेशसाठी शिवम मावीने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर माधव कौशिकने 38 धावांची खेळी केली. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. धवल कुलकर्णीला एक विकेट मिळाली.  


मुंबईचा दुसरा डाव - 
पहिल्या डावात 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेणाऱ्या मुंबईची दुसऱ्या डावात दमदार सुरुवात झाली. मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि यशस्वी जायस्वाल यांनी दमदार सलामी दिली. पृथ्वी शॉ खोऱ्याने धावा खेचत असताना यशस्वी संयमी फलंदाजी करत होता. पृथ्वी शॉ 71 चेंडूत 64 धावा काढून बाद झाला. पृथ्वी बाद झाल्यानंतर यशस्वी जायस्वालने मोर्चा सांभाळला. दिवसअखेर मुंबईने एक बाद 133 धावांपर्यंत मजल मारली आहे. यशस्वी जायस्वाल 35 आणि आरमान जाफर 32 धावांवर खेळत आहेत. 






मुंबईचं फायनलचं तिकिट पक्कं - 
दुसऱ्या डावात मुंबईने आतापर्यंत 346 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुंबईने सामन्यावर पकड मिळवली आहे. उत्तर प्रदेशला फायनलमध्ये पोहचण्यासाठी मुंबई संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणे हा एकमेव पर्याय आहे. कारण, सामना अनिर्णित राहिला तर पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे मुंबईचा फायनलमधील प्रवेश निश्चित मानला जातोय.