सोलापूर: सदाभाऊ खोत यांचा ताफा आज सोलापुरातील एका हॉटेल मालकाने अडवल्याची घटना घडली. गेल्या निवडणुकीवेळी राहिलेले बिल द्यावे यासाठी सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला असल्याची माहिती आहे. ताफा अडवल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
काय आहे घटना?
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे, 2014 सालच्या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये राहिलेले 66 हजार 450 रुपयांचे बिल सदाभाऊ खोत यांनी दिले नसल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी केला. त्या बिलाची मागणी करण्यासाठी आज त्यांनी चक्क सदाभाऊ खोत यांचा गाडीचा ताफाच अडवला. राहिलेले बिल हे आताच द्यावे अशी मागणी त्या हॉटेल मालकाने केली.
या संबंधिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 2014 पासून आतापर्यंत किती वेळ झाला ते तुम्ही मला सांगा असं तो हॉटेल मालक म्हणताना दिसत आहे. त्यावर सदाभाऊ त्या ठिकाणाहून निघून जात असल्याचं दिसत आहे.
काय म्हणाला हॉटेल मालक?
सांगोला तालुक्यातील मांजरी येथे मामा-भाचे या नावाने अशोक शिनगारे यांचे हॉटेल आहे. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत यांच्याकडे 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवलेल्या सदाभाऊंकडे 66 हजार 490 रुपयाचे बिल थकीत असल्याचे अशोक शिनगारे यांनी सांगितलं. त्या बिलाच्या मागणीसाठी त्यांनी आज सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवून पैशाची मागणी केली. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनल्यावर सदाभाऊ यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी शिनगारे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र माझे पैसे टाका अशा भाषेत शिनगारे यांनी आपली उधारी मागितली. आपण अनेकवेळा फोन करूनही सदाभाऊ यांनी आपले पैसे दिले नसल्याचा आरोप हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी केला आहे.
पंचायत राजच्या दौऱ्यावर सांगोल्याला आलेल्या सदाभाऊंची यामुळे मोठी गोची झाली. यानंतर सदाभाऊ यांनी हे राष्ट्रवादीचे कारस्थान असल्याचे सांगत असे कोणतेही पैसे राहिले नसल्याचा दावा केला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्यावर एकाला ताब्यात घेतल्याचा दावा सदाभाऊ यांनी केला असला तरी जेवणाच्या पैशावरून एखाद्या नेत्याला रस्त्यात अडवणे किती बदनामीचे असते याचा अनुभव नक्कीच सदाभाऊ यांना आला असेल.