बाकू (अझरबैजान), Chess World Cup 2023 Final : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची अंतिम सामना सध्या उत्कंठावर्धक परिस्थितीत पोहचला आहे.  पहिल्या गेमप्रमाणे दुसऱ्या गेममध्येही मॅग्नस कार्लसनशी भारताच्या आर. प्रज्ञानंदने बरोबरी साधली. त्यामुळे अंतिम फेरीचा सोक्षमोक्ष टायब्रेकरमध्ये लागणार आहे. यामुळे आता आज 24 रोजी विजेता कोण याचा निर्णय होणार आहे.


बुद्धिबळ विश्वचषकाच्या निर्णायक सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.  विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन आणि भारताच्या प्रज्ञानानंद यांच्यामध्ये आज टायब्रेकर सामना होणार आहे. कार्लसन याला प्रज्ञानानंद याने दोन डावात झुंजवले. प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यात मंगळवार आणि बुधवार सामना झाला, पण दोन्ही डावात निकाल लागला नाही. दोन्ही डाव बरोबरीत सुटले. आज दोघांमध्ये टायब्रेकर सामना होणार आहे. आज बुद्धबळाचा विश्वविजेता कोण हे ठरणार आहे. 


प्रज्ञानानंद याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला. १८ वर्षांच्या प्रज्ञानानंद याने विश्वविजेत्या कार्लसन याला जसासतसे प्रत्युत्तर देत दोन वेळा सामना बरोबरीत सोडला. बुधवारी चांद्रयान ३ यशस्वी झाले, त्यानंतर आता प्रज्ञानानंद विश्वविजेता होणार का ? याकडे भारतीयांच्या नजरा खिळल्या आहेत. 


प्रज्ञानानंद याने पाच वेळच्या विश्वविजेत्या कार्लसन याच्यापुढे आपल्या सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन केले. ३२ वर्षांच्या कार्लसन याने २००४ मध्ये ग्रँडमास्टर हा खिताब मिळवला तेव्हा प्रज्ञानानंद याचा जन्मही झाला नव्हता. प्रज्ञानानंद याचा जन्म २००५ मधील आहे. त्यामुळे या दोघांमधील लढाई विषम पातळीवरील असल्याचे दिसतेय. अनुभवी कार्लसनपुढे युवा प्रज्ञानानंद याचे आव्हान आहे. बुद्धिबळाच्या पटलावर काहीही होऊ शकते, त्यामुळे प्रज्ञानानंद याच्या विजयाची आशा, भारतीयांना आहे. 


सामन्यात आतापर्यंत काय झाले ?


प्रज्ञानानंद याने सलग दोन दिवस दोन्ही डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. बुधवारी अखेरची 35 मिनिटं अटीतटीची झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सामना बरोबरीत सोडण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे दुसरा डावही बरोबरीत सुटला. दोन्ही खेळाडूंच्या 20 चाली झाल्या तेव्हा प्रज्ञानानंद याचा वेळ एक तास सहा मिनिंटं होता. तर कार्लसन याचा वेळ एक तास 18 मिनिंटं इतका नोंदवला गेला. 


मंगळवारी आर. प्रज्ञानानंद याने कार्लसन याला झुंजवले होते. पहिला डाव बरोबरीत सोडला होता. पहिल्या क्लासिकल गेममध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला प्रज्ञानानंद याने बरोबरीत रोखले.  प्रज्ञानानंद याने 35 चालीनंतर बरोबरी साधण्यासाठी यशस्वी खेळी केली. प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू फाबियानो याचा पराभव करत बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये 3.5-2.5 ने विजय मिळवत मोठा उलटफेर केला होता. आता फायनलमध्ये कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.  भारताच्या 18 वर्षीय ग्रँडमास्टरने आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आणि उच्च दर्जाच्या खेळाडूविरुद्ध प्रभावी कामगिरी केली. आता आज प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यामध्ये टायब्रेकर लढत होणार आहे. 


 टायब्रेकरचे नियम काय ?


दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्यानंतर आता रॅपिड फॉर्मेटमध्ये दोन टाय ब्रेक गेम खेळवण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन्ही खेळाडूंना 25 मिनिटांचा अवधी मिळतो. जर टायब्रेकरमधून विश्वविजेता मिळाला नाही तर पुन्हा दहा दहा मिनिटांचे दोन गेम खेळवण्यात येतील.. जर हा सामनाही अनिर्णित राहिला तर पाच पाच मिनिटांचे दोन दोन डाव दिले जातील. यामध्येही निकाल लागला नाही तर अंतिम सामना डेथ राऊंडमध्ये जाईल. म्हणजे, जोपर्यंत विजेता मिळणार नाही, तोपर्यंत तीन तीन मिनिंटाचा डाव होत राहील.